पुणे- संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी गत आठवड्यात आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली होती. त्यांच्या डोक्यावर 32 लाख रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेडून महाराजांच्या कुटुंबावरील कर्जाचे ओझे कमी केले.संत तुकाराम महाराजाचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी 2 दिवसांपूर्वी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली होती. त्यांनी पुण्यातील देहू येथील आपल्या निवासस्थानी गळफास घेतला होता. तत्पूर्वी, एका सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्यावर असणाऱ्या कर्जाचा उल्लेख केला होता. त्यांच्या अंगावर सुमारे 32 लाख रुपयांचे कर्ज होते. याच कर्जातून त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवल्याचे उघड झाले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेत मोरे कुटुंबीयांवरील 32 लाख रुपयांचे कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती त्यांनी रविवारी एका पत्राद्वारे मोरे कुटुंबीयांना कळवली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार विजय शिवतारे यांच्या माध्यमातून ही मदत त्यांना पोहोचती केली.
शिरीष महाराज यांनी आपल्या पत्रात आपल्या मित्रांना आपले कर्ज फेडून कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत एकनाथ शिंदे यांनी हा मदतीचा हात पुढे केला आहे.
शिरीष महाराज कोरोना महामारीच्या अगोदर व्यवसाय क्षेत्रात उतरले होते. कागदी पिशवी बनवून त्यावर छपाई करून देण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला होता. यासाठी त्यांनी कर्जही घेतले होते. पण कोरोना काळात त्यांचा व्यवसाय बंद पडला. त्यामु्ळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यानंतर अडीच वर्षांपूर्वी त्यांनी हॉटेल व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी नादब्रह्म इडलीची फ्रॅन्चायजी घेतली होती. यासाठी काही लाख रुपये मोजले होते. पिंपरी चिंचवड परिसरात हा व्यवसाय आजही सुरू आहे. आधीचे कर्ज असताना त्यांनी या व्यवसायासाठी पुन्हा हे कर्ज घेतले होते.
शिरीष महाराज यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केल्यानुसार, त्यांच्या अंगावर 32 लाख 35 हजार रुपयांचे कर्ज होते. त्यात मुंबई येथील सिंघवींचे 17 लाख, बचत गटाचे 4 लाख, सोने गहाण ठेवलेल्याचे 1 लाख 30 हजार, वैयक्तिक कर्ज 2 लाख 25 हजार, चारचाकी वाहनाचे 7 लाख कर्ज व किरकोळ देणगी 80 हजार असे एकूण 32 लाख 35 हजार रुपयांचे कर्ज त्यांच्या अंगावर होते. त्यांचे लग्न काही दिवसांवरच आले होते. तत्पूर्वीच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.