· सर्व धर्मांमध्ये दिसून येणारी भारतीयता ही गुणसंपदा या पुस्तकात अधोरेखित झाल्याची उपराष्ट्रपतींची भावना
मुंबई, : प्रसिद्ध उद्योगपती आणि हिंदुजा समूहाचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांनी संकलित केलेल्या ‘आय अॅम?’ या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या आज हस्ते झाले. उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी आयोजित एका भव्य समारंभात हा प्रकाशन सोहळा झाला. या प्रसंगी राजकीय, व्यावसायिक आणि राजनैतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
धनखड यावेळी म्हणाले, “हा खरोखरच एक विलक्षण आणि महत्त्वाचा क्षण आहे. गोपीचंद पी. हिंदुजा यांनी संकलित केलेल्या ‘आय अॅम?’ या विचारशील आणि चिंतनात्मक पुस्तकाचे आज प्रकाशन होत आहे. जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक अशा सनातन संस्कृतीच्या भारतभूमीत, जागतिक आध्यात्मिक केंद्रस्थानी हे पुस्तक प्रकाशित होत आहे, याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे पुस्तक भारतीयत्वाच्या सार्वत्रिक महत्त्वावर प्रकाश टाकते. भारतीयत्व ही गुणसंपदा सर्व धर्मांमध्ये दिसून येते. तिच्यानुसार आपण इतरांच्या ‘सत्य’ या तत्त्वाचा सन्मान करू शकतो. त्यासाठी धर्मांतर करणे आवश्यक नसते. एकता म्हणजे एकसंधता नव्हे. भारतीयत्व हे याचे उत्तम उदाहरण आहे. विविधतेतील ऐक्य याचे ते प्रतीक आहे. या माझ्या विधानांना बळकट आधार आहे. युनायटेड किंगडमचे राजे चार्ल्स तृतीय यांनी या विचारांना मान्यता दिली आहे. तसेच, संयुक्त अरब अमिरातीचे धर्मश्रद्धा, सहिष्णुता व इच्छाशक्ती या खात्याचे मंत्री शेख नह्यान बिन मुबारक अल नह्यान यांनीही या ग्रंथाचे गौरवगान केले आहे.”
हिंदुजा ग्रुप ऑफ कंपनीजचे (इंडिया) अध्यक्ष अशोक पी. हिंदुजा आपल्या भाषणात म्हणाले, “विविध सांस्कृतिक आणि भौगोलिक प्रदेशांमध्ये काम करीत असताना आमच्या कुटुंबाने आपली सनातन परंपरा कायम ठेवली आहे. आमच्या व्यवसायाची भरभराट याच कारणामुळे झाली. बहुसांस्कृतिक समजूतदारपणा वाढवणे हा आमच्यासाठी नेहमीच आस्थेचा विषय राहिला आहे. गोपी (जी. पी.) यांनी अनेकदा विचार केला आहे, की धर्म हा जर एखाद्याच्या आध्यात्मिक शोधाचा एक टप्पा असेल, तर मग ज्याने सर्वांना एकत्र आणायला हवे, असा हा धर्म माणसा-माणसांत विभाजन कसे निर्माण करू शकतो? या विषयावर विविध आध्यात्मिक गुरु, विचारवंत आणि जागतिक नेत्यांशी झालेल्या संवादांमधून प्रेरणा घेत, जी. पी. यांनी हे पुस्तक संकलित केले. यातून तरुण पिढीला या जागतिकीकरणाच्या आणि परस्पर जोडलेल्या जगात सकारात्मक दिशा मिळू शकेल.”
परमार्थ निकेतन ट्रस्टचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती म्हणाले, “गोपीचंद पी. हिंदुजा यांचे हे पुस्तक सर्वसमावेशकतेबद्दल बोलते. ‘मी’पासून ‘आपण’पर्यंतचा हा प्रवास आहे. ही मानसिकता बाळगली तरच मानवता आजारातून आरोग्याकडे वाटचाल करू शकते. ऋग्वेदातील वसुधैव कुटुंबकम्’ (संपूर्ण विश्व हे एक कुटुंब आहे) या संदेशाला हे तत्त्व मूर्त रूप देते.”
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, प्रख्यात विधिज्ञ व राज्यसभा सदस्य डॉ. अभिषेक मनु सिंघवी, ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन, ‘एचडीएफसी कॅपिटल’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विपुल रुंगटा, ‘जिंदाल स्टील अँड पॉवर लि.’चे अध्यक्ष व लोकसभेचे सदस्य नवीन जिंदाल आदी उपस्थित होते.