पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित ‘गांधी दर्शन’ शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.रविवार,दि.९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत आयोजन करण्यात आले होते.कोथरूड येथील गांधी भवनच्या सभागृहात हे शिबीर झाले.ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे (हिंदुत्वाची वाटचाल आणि पुरोगामित्वापुढील आव्हाने),ज्येष्ठ लेखक डॉ.हुबनाथ पांडे(आज के दौर में गांधी की अहिंसा),ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे (मराठी ख्रिश्चन समाज),डॉ.कुमार सप्तर्षी या मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
‘ गांधी दर्शन’ विषयावरचे हे १८ वे शिबीर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एड.स्वप्नील तोंडे यांनी केले.तेजस भालेराव यांनी संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन केले.डॉ हुबनाथ पांडे यांचे स्वागत तेजस भालेराव यांनी केले तर श्रीकांत मिश्रा यांनी त्यांचा परिचय करून दिला.गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन ,सचिन पांडुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. हुबनाथ पांडे म्हणाले,’गेल्या दहा वर्षांत जेवढे खोटं बोलले गेले ,तेवढे गेल्या पाच हजार वर्षांत बोलले गेले नव्हते. कुंभमेळ्याची नोंद रामायण महाभारतात मिळत नाही.तो साधारण हर्षवर्धनच्या सातव्या शतकात सुरू झाला. पण, कुंभमेळ्याची सुरूवात पुराणकाळापासून झाल्याची खोटी बतावणीही केली जात आहे.अशा प्रकारच्या अनेक खोट्या गोष्टी जाणून बुजून पसरविल्या जात आहेत, आणि समाजात गोंधळ माजवला जात आहे.यासाठी मोबाईलचा सोशल मीडियाचा साधन म्हणून वापर केला जात आहे. त्यामुळे मोबाईलद्वारे नवीन वैचारिक मानसिक गुलामी आणण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यासाठी मोबाईल फोन स्वस्त करण्यात येत आहेत.’
ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे म्हणाले,’संघ केवळ मुस्लिमविरोधी नसून त्यांचा खरा शत्रू हे धर्मनिरपेक्ष हिंदू आहेत. म्हणूनच त्यांनी दाभोळकर,लंकेश आदींच्या हत्या झाल्या.संघवाल्यांना मुस्लिमांना इजा पोचवायची नाही, त्यांना सतत भितीच्या छायेत ठेवायचे आहे.२०१४ नंतर हिंदुत्वचा विखार उघडपणे, अधिक वाढला आहे,जो संधी मिळाल्याने जाहिरपणे बाहेर आला आहे.संघाची प्रेरणा ही हिंदुराष्ट्र स्थापन करणे हे असून, मुस्लिमांना दुय्यम स्थान देणे हे धोरण आहे, या बाबतीत हिटलर हा त्यांचा आदर्श आहे’.
ते म्हणाले,’राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विविध प्रकारची आर्मी तयार केली असून देशातील संघविरोधी लोकांना आणि विचारांना हर प्रकारे दडपून टाकण्यासाठी हे आर्मीदल कार्यरत आहेत.या आर्मी दलाची जबाबदारी बजरंग दलसारख्या संघटनांवर दिली आहे, त्यामुळे बिल हे थेट मोदींवर फाडले जात नाही, पण मोदी यांची या सर्व हिंसाचाराला पूर्ण मूक सहमती आहे’.
डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले ,’सर्व समाजातील जातीयवाद संपला तर संघाच्या विषारी व्यवस्थेचा आणि धोरणांचा निःपात करता येईल, आणि संघप्रेमी ब्राह्मणांना खऱ्या अर्थाने शहाणे आणि धर्मनिरपेक्ष करावे लागेल, हेच विचारवंत आणि समाजसेवकांपुढील पुढील आव्हान आहे .’