पुणे, ८ फेब्रुवारीः हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुप यांच्या संयुकक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदू गर्जना चषक’ महिला व पुरूष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेस आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. राज्यातील कुस्ती तज्ञांना घेऊन कुस्तीचा एक नीट कार्यक्रम आखण्यात यावा. भविष्यकाळामध्ये होणार्या एशियाड, ऑलंपिक्स् गेम्स्, कॉमनवेल्थ गेम्स्, वर्ल्ड कप अशा जागतिक स्तरावरच्या स्पर्धेत पदतालिकेमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे दिसावा अशी अपेक्षा मी व्यक्त करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी स्पर्धेचे आयोजक पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. पुणे जिल्ह्याचे पहिली महाराष्ट्र केसरी पै. रघुनाथ पवार, महाराष्ट्र केसरी २०२५ पै. पृथ्वाराज मोहोळ आणि पहिल्या खो-खो विश्वचषक विजेत्या संघाचे प्रशिक्षक व पुण्याचे शिरीन गोडबोले, शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू सुयश गरगटे, आदित्य गणपुले यांचा विशेष सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पै. सिकंदर शेख याच्या थरारक सामन्याचा आनंद देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी धीरज घाटे यांचे थोरले बंधू स्व. धनंजय घाटे यांना आदरांजली वाहीली.
कुस्तीपटूंना संबोधित करताना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कुस्ती क्रीडा प्रकार भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये प्राचीन काळापासून लोकप्रिय असून त्याला एक पारंपारीक वारसासुद्धा आहे. राज्य तसेच पुणे जिल्हा हा पैलवानांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पहिले महाराष्ट्र केसरी पै. रघुनाथ पवार यांचा सन्मान आपण आज केला असून ही जी परंपरा आपण पुढे नेली पाहीजे. त्यासाठी अशा भव्यदिव्य कुस्ती स्पर्धा आयोजनांची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. मागच्या काळामध्ये कुस्ती खेळासाठी आणि कुस्तीपटूंसाठी राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या. राष्ट्रीय, राज्य तसेच जिल्हा अशा वेगवेगळ्या स्तरांवर होणार्या स्पर्धांमध्ये राज्यांच्या कुस्तीपटूंची वाढ झाली पाहीजे, असा आमचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत पदतालिकामध्ये पाहिजे त्या प्रमाणात राज्याचे कुस्तीपटू जिंकत नाहीत. त्या दृष्टीने अजुन काय प्रयत्न करावे लागतील, उत्तम प्रशिक्षण कसे करता येईल, याचा विचार करावा लागेल, त्यासाठी राज्याचे सरकार पुढाकार घ्यायला तयार आहे. यासाठी राज्यातील कुस्ती तज्ञांना घेऊन कुस्तीचा एक नीट कार्यक्रम आखण्यात यावा. भविष्यकाळामध्ये होणार्या एशियाड, ऑलंपिक्स् गेम्स्, कॉमनवेल्थ गेम्स्, वर्ल्ड कप अशा जागतिक स्तरावरच्या स्पर्धेत पदतालिकेमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे दिसावा अशी अपेक्षा मी व्यक्त करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.