पुणे: पुतण्याने काकावर धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना पाषाण गावातील कोकाटे आळीमध्ये शनिवारी(८ फेब्रुवारी) सकाळी घडली आहे. हा खून मालमत्तेच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पुतण्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, पाषाण गावात पुतण्याने काकावर मालमत्तेच्या वादातून धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. महेश जयसिंगराव तुपे (वय ५६, रा. विठ्ठल मंदिराजवळ, पाषाण गाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शुभम महेंद्र तुपे (वय २८), रोहन सूर्यवंशी (वय २०), ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, तिघे रा. पाषाण गाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेश तुपे यांचा मुलगा वरद (वय १९) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी शुभम महेंद्र तुपे (वय २८) हा मयत महेश तुपे यांचा पुतण्या आहे. त्यांच्यामध्ये मालमत्तेवरुन वाद सुरू होता. महेश आणि शुभमची आई या दोघांचे एकत्र बँक खाते आहे. या बँक खात्यातील पैशांची मागणी शुभम काका महेश तुपे यांच्याकडे करत होता. नंतर यावरुन काका पुतण्यात वाद झाला.दरम्यान, शुभमने त्याचा मित्र रोहन आणि ओम या दोघांची मदत घेऊन काका महेश यांचा खून करण्याचा कट रचला. शनिवारी (८ फेब्रुवारी) सकाळी साडेसहाच्या सुमारास महेश पाषाण गावातील कोकाटे आळीतून दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. आरोपी शुभम आणि त्याचे मित्र आळीतील गणपती मंदिराजवळ लपून बसलेले होते. त्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. त्यानंतर महेश गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र उपाचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे, चतु:शृंगी पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अश्विनी ननावरे घटनास्थळी तातडीने पोहचले. या खून प्रकरणातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पुतण्यानेच काकांचा केला खून
Date: