पुणे- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत अनियमितता झाली असल्याचा आरोप लोकसभेतील काँग्रेसची विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला. या आरोपाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांना तुम्ही कितीही खरे सांगा, ते अजिबात ऐकत नाहीत. ते दुसरे मुन्नाभाई एमबीबीएस असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणालेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी 2019 च्या घटनाक्रमाबाबत देखील मोठा गौप्यस्फोट केला. अमित शहांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री नाकारले होते, त्यानंतर मीच त्यांना उपमुख्यमंत्रीपद ऑफर केले होते, असे फडणवीस यांनी सांगितले.
पुण्यात एका कार्यक्रमात आयोजित मुलाखतीत बोलताना 2019 च्या घटनाक्रमाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीवेळी आम्ही युतीसाठी बसलो होतो. आमची युती फायनल झाली होती. पण एका रात्री उद्धव ठाकरेंनी मला सांगितले, “देवेंद्रजी, आम्हाला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद पाहिजे. मी तुमच्या वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट टाकली आहे. आता अंतिम निर्णय आज करू. आम्हाला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद हवे आहे. रात्री 1 वाजता उद्धव ठाकरे मला बोलले.” मी म्हटले, मी याबाबतचा निर्णय घेऊ शकत नाही. माझा पक्ष संसदीय बोर्डाच्या माध्यमातून निर्णय घेतो. आमचे अध्यक्ष अमित शाह आहेत. मी अमित शाह यांच्याशी बोलतो. त्यानंतर मी अमित शाह यांना रात्री 1 वाजता फोन केला. ते जागे होते. मी त्यांना म्हटलं आपलं सीट शेअरिंग फायनल झालं आहे. पण उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद हवं. अमित शाह म्हणाले, ते मंजूर नाही. तुम्ही त्यांना सांगा आम्हाला मंजूर नाही, असे उद्धव ठाकरेंना सांगितले. त्यावेळी मी त्यांना, मागच्यावेळी आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्रिपद दिले नव्हते. यावेळी तुम्हाला उपमुख्यमंत्रिपद देऊ शकतो, असेही सांगितले होते, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे बोलताना राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. महाराष्ट्राने एक है तो सेफ है चा नारा आता देशाने देखील हा नारा स्वीकारल्याचे ते म्हणाले. जयपूर डायलॉग या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी ताउम्र गालिब हम यही भूल करते रहे, धूल चेहरे पर थी और हम आइना साफ करते रहै, अशी शेरोशायरी करत राहुल गांधी यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.
राहुल गांधी यांचे एक वेगळेपण आहे. तुम्ही कितीही खरे सांगा, ते अजिबात ऐकत नाहीत. ते दुसरे मुन्नाभाई एमबीबीएस आहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. राहुल गांधी अर्बन नक्षलवाद शक्तींना बळ देण्याचे काम करत आहेत. आमच्या व्यवस्थेतील संस्थांवर अविश्वास व्यक्त करतात. ज्यातून आमच्या लोकशाही व्यवस्थेवर जनतेचा विश्वास उडवण्याचा प्रयत्न अर्बन नक्षलकडून सुरू आहे. त्याला राहुल गांधी बळ देतात, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला.देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लोकसभेत राज्यात पराभव झाल्यानंतर विधानसभेसाठी कशी तयारी केली यावरही भाष्य केले. विरोधी पक्षाशी आपण लढू शकतो, हे कार्यकर्त्याला सांगणे गरजेचे होते. आपण हरलो नाही. आपल्याला चांगली मते मिळाली आहेत. 2 कोटी 50 लाख महाविकास आघाडीला मिळाले , तर भाजप 2 कोटी 38 लाख मत मिळाले. आपण जिंकू शकतो असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला, असे ते म्हणाले.