पुणे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयामु्ळे अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला असून, खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करण्याच्या परंपरेचा आज अंत झाला आहे, असे ते म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, दिल्ली विधानसभेवर 27 वर्षांनंतर भाजपचा झेंडा रोवला गेला. याचा मला अतिशय आनंद आहे. दिल्लीच्या तमाम कार्यकर्त्यांचे व जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो. दिल्लीकरांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला. या विजयामुळे आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला आहे. त्यांनी सातत्याने खोटी आश्वासने देऊन आणि लोकांची दिशाभूल करत ज्या प्रकारे राज्य केले, त्या परंपरेचा आज अंत झाला आहे. खोटे राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिले आहे.
दिल्लीची जनता लोकसभेत मोदींवरच विश्वास दाखवायची, पण विधानसभेला मात्र कुठेतरी आमची पिछेहाट होताना आम्ही पाहिली. पण आता एक प्रचंड मोठा विजय दिल्लीच्या जनतेने दिला आहे. अरविंद केजरीवाल यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा हात पकडून त्यांच्या आंदोलनातून आपले राजकारण सुरू केले. पण नंतर ते भ्रष्टाचाराचे प्रतीक बनले. त्याला दिल्लीच्या जनतेने उत्तर दिले आहे. निश्चितपणे हे विकासाला व मोदींवरील विश्वासाला दिलेले मत आहे. भाजपचे सरकार दिल्लीत लोकांच्या आशा – आकांक्षा निश्चितपणे पूर्ण करेल. त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणेल, असे फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी निवडणुकीत भोपळाही फोडता न आलेल्या काँग्रेसवर विशेषतः राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, लोकांनी मोदींना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. या यज्ञात एखादी समिधा आमचीही आहे. त्यात दिल्लीतील मराठी माणूस मोदींच्या पाठिशी उभा राहिला याचा मला आनंद आहे. राहुल गांधी यांना काँग्रेसचा पराभव डोळ्यापुढे दिसत होता. त्यामुळे त्यांनी कालच तशी कव्हर फायरिंग केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरही भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलताना आपण जनभावनेचा विचार करूनच बोलले पाहिजे. लोकांची भावना दुखावेल अशा प्रकारच्या इतिहासाचे वर्णन किंवा विकृतीकरण कुणाच्याही हाताने होऊ नये. यासंदर्भात त्यांनी माफी मागितली आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई होईल, असे ते म्हणाले.