पुणे :ज्येष्ठ कथक गुरू मनीषा साठे यांनी स्थापन केलेल्या ‘मनीषा नृत्यालय’ च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ‘स्वर्ण वंदना’ या भव्य कथक नृत्य सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार,दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता गणेश कला क्रीडा केंद्र, स्वारगेट, पुणे येथे आयोजित करण्यात आले होते.
हा कार्यक्रम सॅन फ्रान्सिस्को, अमेरिकेत कार्यरत असलेल्या ‘शांभवीज इंटरनॅशनल स्कूल ऑफ कथक’ (एसआयएसके) संस्थेच्या प्रमुख शांभवी दांडेकर यांनी आयोजित केला होता. या विशेष सादरीकरणात तीन पिढ्यांतील ५१ नर्तकांनी एकाच मंचावर कथक गुरू-शिष्य परंपरेचा सुवर्णमहोत्सव साजरा केला.

‘स्वर्ण वंदना’ या ऐतिहासिक कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध कथक नृत्यांगना शांभवी दांडेकर आपल्या वरिष्ठ शिष्यांसह आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसह सहभागी झाल्या होत्या . यात अमृता परांजपे, अस्मिता ठाकूर, नेहा मुथीयान, प्राची फडणीस, शीतल लाळगे, रेश्मा नागर, श्रुती आपटे, मृणालिनी खटावकर या कलाकारांसह त्यांच्या शिष्याही सहभागी झाल्या होत्या .शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभिनय प्रकारातील रचना आणि काही समांतर रचना सादर करण्यात आल्या. रसिकांनी या सर्व सादरीकरणाला भरभरून प्रतिसाद दिला.पं. मनीषा साठे, पं. सुहास व्यास, माधुरी सहस्त्रबुद्धे , मंगला गोडबोले, पं. शमा भाटे, संजीव अभ्यंकर, डॉ.सतीश देसाई, आदी मान्यवर सभागृहात उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी दिल्लीतील वरिष्ठ कथक गुरू पंडिता गीतांजली लाल या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. प्रसिद्ध मराठी लेखिका, अभिनेत्री आणि टॉक शो सूत्रसंचालक मुग्धा गोडबोले यांनी या विशेष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी ज्येष्ठ शिष्यांचा सत्कार करण्यात आला.
गीतांजली लाल म्हणाल्या,’ मनिषाताईं प्रमाणेच पंडित गोपीकृष्ण यांचाकडे तालीम घेतली. तेथून आमचे नाते दृढ झाले. मनीषा साठे यांच्या मुळे ही कला पुण्याने पुढे नेली. चांगले, प्रतिभावान कलाकार घडवले. मनीषा नृत्यालय आणि शांभवीज इंटरनॅशनल स्कूल ऑफ कथक ही परंपरा पुढे नेत आहेत. कलेसाठी एक आयुष्य अपुरे पडते. पुण्यात गुणीजन आहेत.त्यातून साठे यांची साधना प्रत्यक्षात आली आहे ‘.
मनीषा साठे म्हणाल्या ,’या स्वर्ण वंदनेने मी भारावून गेले आहे. रसिकांची पाठीवर थाप पडत गेली. विदयार्थिनी घडवणे, हा श्वास बनला. शिस्त असेल तर यशाकडे मार्गक्रमण करता येते. श्रध्दा, निष्ठेने केलेला रियाझ आवश्यक असतो. कथक ही अभिजात नृत्य शैली आहे, सर्व कलांची अनुभूती देते. आस्वादक, आश्वासक पणे शिकणाऱ्या सर्वांना पाठिंबा देते.अशा शिष्या मिळणे हे भाग्य समजते. सुवर्ण महोत्सवाचे वर्षभर उपक्रम सुरु राहतील, आपण पाठिंबा द्यावा’ .
शांभवी दांडेकर म्हणाल्या,’ अशा कार्यक्रमातून शहर,परिवार, परंपरा याबदल कृतज्ञतेची भावना व्यक्त करावी वाटते.नृत्य आवडीची गोष्ट म्हणून करणे, आणि व्यवसाय म्हणून यशस्वी पणे देखील करणे आवश्यक आहे ‘.कार्यक्रमाच्या शेवटी श्री रागातील तराण्यावर तीन पिढ्यांच्या ५१ नर्तकांनी नृत्य केले. त्याने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटले.