नागपूर -लवकर दिल्लीतील विभानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत त्यांचा पक्ष पराभूत होईल, हे त्यांना माहिती आहे. त्यासाठी आधीच नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, राहुल गांधींना मतदार कुठून आले यांचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले आहे. खोटं बोलून स्वत:चे समाधान करण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांच्याकडून केला जातो आहे. राहुल गांधी आता कव्हर फायर करण्याचा प्रयत्न करत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. लोकसभा ते विधानसभा निवडणूक यातील पाच महिन्यांच्या कालावधीत 39 लाख नव्या मतदारांची नोंदणी झाली, हे मतदार कोण आहेत? या सर्वांचा तपशील आम्हाला द्या, अशी मागणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 8 फेब्रुवारी रोजी दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींचा पक्ष दिल्लीत कुठेही राहणार नाही. हे त्यांना माहीत आहे आणि म्हणूनच ते त्या दिवशी काय बोलायचे आणि एक नवीन कथा कशी तयार करायची याचा सराव करत आहेत. जर राहुल गांधींनी आत्मपरीक्षण केले नाही आणि असेच खोटे बोलून स्वतःचे सांत्वन केले तर काँग्रेसला पुन्हा उभारी घेता येणं शक्य नाही. राहुल गांधींनी त्यांच्या पराभवाचे आत्मपरीक्षण करावे.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत अनियमितता झाली असल्याचा आरोप लोकसभेतील काँग्रेसची विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे. या संदर्भात राहुल गांधी, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आम्हाला अनेक अनियमित आढळल्या असल्याचे यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले. निवडणूक आयुक्त निवडण्याची पद्धत देखील सरकारने बदलली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
या संदर्भात राहुल गांधी म्हणाले की, लोकसभेपूर्वी 32 लाख मते आणि विधानसभेपूर्वी 39 लाख मते जोडली गेली. 5 महिन्यांत 7 लाख नवीन मतदार जोडले गेले आहेत. आम्ही निवडणूक आयोगाला याची चौकशी करण्यास सांगितले. आम्ही मतदार यादी, नावे आणि पत्ते मागवले आहेत. त्यांची छायाचित्रेही द्यावीत अशी आमची मागणी आहे. आम्हाला लोकसभा आणि विधानसभेची मतदार यादी हवी आहे. अनेक मतदारांची नावेही हटवण्यात आली आहेत. ही दलित, अल्पसंख्याक मते आहेत. मी कोणतेही आरोप करत नाही, पण काहीतरी गडबड आहे का? असा आमचा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.