मुंबई-बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरमध्ये जबाबदार पोलिसांवार अद्याप गुन्हा का नोंदवला नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला. या प्रकरणाची स्टेट सीआयडीकडून स्वतंत्र चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणाची आयोगामार्फत समांतर चौकशीही सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात तातडीने कारवाई करण्यात कायदेशीर अडचणी असल्याचे विशेष सरकारी वकिलांनी हायकोर्टात सांगितले. दरम्यान, अक्षय आई-वडिलांनी ही केस न लढण्याची भूमिका घेतली आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला होता. हा एन्काउंटर फेक असल्याचा आरोपी अक्षयच्या आई-वडिलांनी केला होता. या एन्काउंटरविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या एन्काउंटरची चौकशी करण्यात आली. चौकशीअंती उच्च न्यायालयाने या एन्काउंटर प्रकरणात 5 पोलिसांना दोषी ठरवले होते. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
अक्षय शिंदेचा कथित बनावट एन्काऊंटर प्रकरण उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. अक्षय शिंदेच्या वडिलांनी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) तपास करण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती. यावर ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, हेडकॉन्स्टेबल अभिजित मोरे, हरिश तावडे आणि एक पोलीस ड्रायव्हर यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली.
दरम्यान, अक्षय शिंदेचे बनावट एन्काउंटरचे प्रकरण आता आम्हाला न्यायालयात लढवायचे नाही, अशी भूमिका अक्षय शिंदेच्या आई-वडिलांची घेतली आहे. आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. आम्हाला दररोजची धावपळ आणि प्रवास जमत नाही. आमच्या राहण्याची कुठेही सोय नाही. त्यामुळे अशात आम्हाला हा न्यायालयीन लढा लढायचा नाही, असे सांगत अक्षय शिंदेच्या पालकांनी केस लढण्यास नकार दिला आहे. या प्रकरणावर उद्या शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.