पुणे-
राज्यात सरकारस्थापन होऊन बरेच दिवस झालेत, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान म्हणून ओळख असणाऱ्या वर्षा बंगल्यात राहायला न गेल्यामुळे संजय राऊत यांनी राग उठवले आहे. वर्षा बंगला परिसरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्याची शिंग पुरले असल्याचा चर्चा सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला. मुख्यमंत्री वर्षावर कधी जातील, याच्याशी तुमचे काय घेणे देणे, असा सवाल करत अजित पवारांनी संजय राऊतांवर टीका केली.
राज्याचे मुख्यमंत्री यांचे अधिकृत निवासस्थान हे मलबार हिल परिसरातील वर्षा हा बंगला आहे. त्यामुळे वर्षा हा बंगला कायमच चर्चेत असतो. मात्र, उपमुख्यमंत्री पदावरुन मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री पदाचे उपमुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी अद्याप वर्षा बंगल्यात संदर्भात काहीही निर्णय घेतलेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्याकडून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होत आहे. या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.
पिंपरी चिंचवड येथे आज पोलिस आयुक्त कार्यालयाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांनी घर खाली केल्यानंतर मुख्यमंत्री तिथे राहायला जात नाहीत. मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर कधी जातील, याच्याशी तुमचे काय घेणे देणे, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय राऊत यांना केला. आता वर्षा बंगला पाडून तिथे नवीन बिल्डींग बांधायची, असेही म्हणत आहेत, असा शब्दांत अजित पवारांनी समाचार घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर न जाण्याचे कारणही सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या लेकीची दहावीची परीक्षा आहे. मुलगी एकुलती एक असल्यामुळे ती जे म्हणेल, ते मुख्यमंत्र्यांना ऐकावे लागते. माझी परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर राहायला जाऊ, असे त्यांच्या मुलीचे म्हटले आहे. कोणीतरी रोज सकाळी टीव्हीवर भोंगा वाजवतो. आता असे होणार, आता तसे होणार, असे ते सांगतात. वर्षावर आमकं पुरलंय, तमकी शिंगे पुरली. यापेक्षा राज्याचे हित कशात आहे, ते बघा, असा टोला अजित पवार यांनी संजय राऊतांना लगावला.