माझ्या बहिणीवरही अत्याचार
मुंबई-वाल्मिक कराडने मला कलेक्टर दीपा मुधोळ-मुंडे यांच्या कक्षात त्यांच्यासमोर मारहाण केली. यावेळी त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गुरुवारी करुणा मुंडे यांनी केली. मला धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी म्हणून कोर्टाने मान्यता देत पोटगी दिली आहे. करुणा धनंजय मुंडे नावासाठी मी मोठी किंमत चुकवली. यापुढे मला करुणा शर्मा नाही, तर करुणा धनंजय मुंडे म्हणावे असे आवाहनही त्यांनी केले.
करुणा मुंडे यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या पहिली पत्नीची मान्यता देत, त्यांना दर महिना सव्वालाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निकालानंतर करुणा मुंडे यांनी पत्रकारांशी सविस्तर संवाद साधत आपली कैफयित मांडली.
करुणा मुंडे म्हणाल्या की, गेली 3 वर्षे मी ह्या प्रकरणात लढत आहेत. यात मला खूप त्रास झाला, पण माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास होता. मी कोर्टाचे, न्यायाधीश आणि एक रुपया न घेता माझ्या बाजू मांडणाऱ्या माझ्या वकिलांचे आभार मानते. वाल्मीक कराड यांने मला जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात मला मारहाण केली, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तर 15 लाख रुपयांची पोटगी देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
करुणा मुंडे म्हणाल्या की, मला जी पोटगीची रक्कम मिळणार आहे ती तुटपुंजी आहे. माझ्या घराचा 1 लाख 70 हजार रुपये हप्ता आहे. 30 हजार रुपये मेंन्टेनन्स खर्च आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीकडे हजारो कोटींची संपत्ती आहे. पण आमच्या नावावर काहीच नाही. माझा मुलगा 21 वर्षांचा असून तो घरात बेरोजगार बसला आहे. आम्हाला महिन्याला कमीत कमी खर्च 15 लाख रुपये हवे आहेत. त्यासाठी मी हायकोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
करुणा मुंडे म्हणाल्या की, वाल्मीक कराड यांने मला जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात मला मारहाण केली. वाल्मीक कराडने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. त्याने माझी गाडीही फोडली. यांच्याकडून मला खूप त्रास देण्यात आला. माझ्या बहिणीवर अत्याचार करण्यात आला. हे सर्व प्रकार आम्ही कोर्टात मांडले. सव्वालाख लाख रुपयांच्या पोटगीवर आम्ही समाधानी नाही. या प्रकरणात माझ्या आईच्या जीव गेला आहे. तिने आत्महत्या केली होती.
करुणा मुंडे म्हणाल्या की, कोर्टात हे प्रकरण सुरू होते तेव्हा अनेकदा माझी आणि धनंजय मुंडेंची भेट झाली त्यांनी मला हे प्रकरण मिटवून घ्यावे असे अनेकदा सांगितले. कारण यात माझ्या मुलाचे आणि मुलीचे शिक्षण बंद आहे. माझ्या मुलांना खूप त्रास होत आहे. माझ्या मनात अनेकदा विचार येतो की, आत्महत्या करावी, पण माझ्या आईने आत्महत्या केल्यांतर मला किती त्रास झाला ही मला लक्षात येते. जर माझी आई असती तर देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा जरी धनंजय मुंडे यांना पाठिंबा असता तर मला रोडवर सोडू शकले नसते.
करुणा मुंडे म्हणाल्या की, मी मुंबईत राहत असताना माझ्या घरी कधीही पोलिस येत होते आणि मला पोलिस ठाण्यात घेऊन जात. म्हणून मी मुंबई सोडली आणि आता बीडमध्ये राहते आहे. मी अगदी छोट्या घरात राहते आहे. आमच्या वादानंतर धनंजय मुंडे यांनी राजश्री मुंडेच्या नावावर संपत्ती केली. 27 वर्षे मी धनंजय मुंडे यांच्यासोबत संसार केला आहे. आमच्या नावावर त्यांची काही संपत्ती नाही. पण दुसऱ्या पत्नीच्या नावावर संपत्ती आहे, त्याविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. धनंजय मुंडेंच्या कुटुबांसोबत नेहमी बोलणे होत असते, माझ्या मुलांचे आणि धनंजय मुंडे यांचे नातं खूप चांगले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांनी माझ्या दोन्ही मुलांचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला आहे. पण माझा उल्लेख केला नाही. आम्ही लिव्ह इनमध्ये राहिलो नाही तर 27 वर्षे संसार केला. मी निवडणूक आयोगात केस टाकली आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. धनंजय मुंडेंनी विधानसभेची निवडणुकीच्या वेळी 200 बुथवर मतदान होऊ दिले नाही. तिथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान केले.

