पुणे, दि. ५ : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया असून या प्रक्रियेत लॉटरी पध्दतीने सोडत काढून प्रवेश पात्र लाभार्थी व प्रतिक्षाधिन लाभार्थी याची शाळानिहाय यादी घोषित केली जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही. पालकांनी बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये असे आवाहन शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी केले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार आरटीई २५ टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील मुला-मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. पालकांना प्रलोभन देण्याचे गैरप्रकार निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), प्रशासन अधिकारी मनपा, नपा, संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे (depmh2@gmail.com), आयुक्त (शिक्षण), पुणे (educommoffice@gmail.com) यांचेकडे ई-मेलद्वारे अथवा समक्ष आपली तक्रार पुराव्यासह नोंदविण्यात यावी.
असा कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही श्री. गोसावी यांनी कळविले आहे.
0000