पुणे – पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात अप्पर इंदिरानगर परिसरात एका गुंडांच्या टोळक्याने दहशत पसरविण्यासाठी रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या नागरिकांच्या कार, टेम्पाे, दुचाकी अशा 50 ते 60 वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. याप्रकाराने नागरिकांनी मनस्ताप व्यक्त केला असून बिबवेवाडी पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात गुन्हा दाखल करण्यात येऊन तीन आराेपींना अटक करण्यात आली आहे.
अंडी ऊर्फ निरंजन देवकर, अभिषेक पांढरे व गणराज सुनील ठाकर अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. सदर आराेपींनी गुन्हयात वापरलेली वाहने देखील पोलिसांनी जप्त केली असून त्यांच्या विराेधात कडक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पर इंदिरानगर परिसरातील दुर्गा माता मंदिर भागात बुधवारी मध्यरात्री एका टोळक्याने रस्त्याच्या कडेला पार्किंग करुन लावण्यात आलेल्या दुचाकी,कार, टेम्पो, रिक्षांची लाकडी दांडक्याने तुफान तोडफोड करत शिवीगाळ करुन टाेळक्याने दहशत पसरवली.वाहन तोडफोडीचा आवाज ऐकल्यानंतर नागरिकांनी आरडाओरडा केल्यावर टोळके घटनास्थळावरुन दुचाकीवर पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच, बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरु केला.तीन आराेपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आराेपींचे अन्य साथीदार यांचा देखील शाेध घेण्यात येत आहे. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.