कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे घोषणा
पुणे : शतकोत्तर रौप्यमहोत्सव संपन्न झालेल्या श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे देण्यात येणारे अत्यंत मानाचे गुरु महात्म्य पुरस्कार यंदा विज्ञाननिष्ठ अध्यात्माचे प्रणेते अभिजीत पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे आणि लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर यांना प्रदान करण्यात येणार आहेत. रविवार, दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात येतील, अशी माहिती दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला कार्यकारी विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, खजिनदार अॅड. रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उप प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, अॅड. शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे आदी उपस्थित होते. श्री दत्त महाराजांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह, महावस्त्र व रुपये २५,०००/- असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारांचे हे तीसावे वर्ष असून मंदिराचे यंदा १२७ वे वर्ष चालू आहे
कार्यक्रमात खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉ. किरण ठाकूर हे लोकमान्य चे संस्थापक असून सुरुवातीपासून त्यांनी समावेशक विकासाच्या तत्वज्ञानाला पुढे नेले आहे. प्रख्यात पत्रकार म्हणून त्यांची ओळख असून तरुण भारत च्या माध्यमातून दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना गौरविण्यात येणार आहे.
इतिहास संशोधन क्षेत्रात तसेच मोडी लिपीच्या अभ्यासात भरीव योगदान देत, इतिहासातील अनेक संदर्भ समोर आणून सामान्यांपर्यंत आपल्या इतिहास पोहोचविणा-या पांडुरंग बलकवडे यांना गुरुमहात्म्य पुरस्काराने गौरवण्यात येईल. तसेच, अभिजीत पवार यांनी उद्योग, प्रसार माध्यम व सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून बहुमूल्य योगदान दिले आहे. गेली अनेक वर्ष विज्ञाननिष्ठ अध्यात्म व प्राचीन भारतीय तत्वज्ञान, वेद उपनिषद व धर्मग्रंथांचा सखोल अभ्यासक म्हणून त्यांची ओळख युवा पिढीला आहे. अध्यात्मिक पुनरुत्थानाच्या भरीव कार्यासाठी त्यांचा ट्रस्टतर्फे गौरव करण्यात येणार आहे.

