पुणे दि.४: राज्याचे युवा धोरण जाहीर करण्यात असले असून या शिफारशींच्या अनुषंगाने राज्य व जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येणार आहेत. तरी २०२३-२४च्या पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम या स्वरुपात पुरस्कार देण्यात येणार आहे. युवक, युवतीसाठी रोख रक्कम ५० हजार रुपये तर संस्थेकरीता १ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. युवक-युवती १३ ते ३५ या वयोगटातील असावा. अर्जदाराचे त्या जिल्ह्यात सलग ५ वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. पुरस्कार दिल्यानंतर दोन वर्ष क्रियाशील राहणे आवश्यक आहे. संस्था नोंदणीकृत व किमान पाच वर्ष कार्यरत असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवार, संस्थेने मुलाखती व कार्याची संगणकीय सादरीकरणाची (पीपीटी) सीडी आदी सबळ पुरावे पृष्ठांकन करुन जोडणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी व अर्जासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, मोझे हायस्कुल समोर, येरवडा-06 (क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार भ्रमणध्वनी क्र. ९५५२९३१११९) येथे संपर्क साधावा, असे श्री. कसगावडे यांनी केले आहे.