मुंबई/पुणे -जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पाचे (ता. मुळशी) मजबुतीकरण व गळती रोखण्याच्या कामांकरिता ३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
टेमघर धरणातून पुणे शहराला दरवर्षी ३.४०९ अघफू पाणी पिण्यासाठी उपलब्ध केले जाते. तसेच मुळशी तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याद्वारे १ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. हा प्रकल्प पुणे शहराच्या वरच्या बाजूस आहे. या प्रकल्पाला गळती लागल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. यामुळे धरणाच्या तसेच पुणे शहराच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसा अहवाल विविध समित्यांनी दिला आहे. त्यांच्या शिफारशींचा विचार करता धरणाची गळती रोखण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. हे काम केल्याने गळती थांबणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठीही पाणी उपलब्ध होणार आहे. या सर्व बाबींचा एकत्रित विचार करता आज झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने टेमघर प्रकल्पाच्या गळती रोखण्यासाठीच्या उपाययोजना व धरण मजबुतीकरण कामासाठी ३१५ कोटी ५ लाख रुपयांच्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली.
टेमघरच्या खराब बांधकामासंदर्भात शासनातर्फे मुकुंद विठ्ठल म्याकल (४२) यांनी फिर्याद २०१६ मध्ये पोलिसात दिलेली आहे. दोन कंपन्यामधील ९ जणांनी व इतर २४ शासकीय अधिकाऱ्यांनी संगनमत करून धरणाचे बांधकाम करताना बनावट व कमी दर्जाचे साहित्य वापरून धरणाची गुणवत्ता राखली नाही. तसेच खोटे दस्तावेज करून शासनाच्या निधीचा अपहार करून फसवणूक केली.अशी हि तक्रार होती धरणातून पाण्याची गळती होत असल्याचे समोर आल्यानंतर तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी धरणाची पाहाणी केली.आणि एकूण ३४ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणाचे पुढे काय झाले ते समजू शकले नाही. मात्र त्यापूर्वीपासून धरणाची दुरुस्ती सुरूच असल्याचे सांगितले जाते.