मुंबई-सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्री असताना पावणे तीनशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मात्र, या पत्रकार परिषदेतून धनजंय मुंडेंना लक्ष्य करताना, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सेफ करण्याचा प्रयत्न दमानिया यांच्याकडून केला जातोय का? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. तसेच या पत्रकार परिषदेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपीही त्यांनी केला.
सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्यांनी अंजली दमानियांच्या पत्रकार परिषदेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच पत्रकार परिषदेतील एक वाक्यावर आक्षेप घेत या पत्रकार परिषदेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या.
पत्रकार परिषदेत बोलताना आज दमानिया देवेंद्र फडणवीस आणि तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका सेफ झोनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न का करत होत्या ते कळलं नाही, असा प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

अंजली दमानियांच्या लढ्याबद्दल कौतुकच. पण आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना, “… एक डेप्युटी सेक्रेटरी आहे आणि तोही कराडच ” हे वाक्य पत्रकार परिषदेला जातीय रंग देणारे आहे याचे कृपया त्यांना भान असावे. वाल्मीक कराड किंवा या हत्या प्रकरणाशी संबंधित जो जो गुन्हेगार आहे त्या प्रत्येकाला फाशीच व्हायला हवी. मात्र कराड नावाची प्रत्येक व्यक्ती गुन्हेगारच असते हा चष्मा काढून टाका. कारण मग या न्यायाने आपण वि. दा. कराड यांना सुद्धा गुन्हेगार ठरवायला मागेपुढे बघणार नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फोकस हलू नये यासाठी ही मांडणी महत्वाची आहे, असे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

