मुंबई-सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन बीड प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात सर्वात मोठा खुलासा करण्याची घोषणा केली आहे. उद्याच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंडेंची पाठराखण करता येणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेकडे अवघ्या राज्याचे डोळे लागले आहेत.अंजली दमानिया सोमवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या की, मी राज्य सरकारला 4 दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. या चार दिवसांत सरकारने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची गरज होती. पण सरकारने या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. मी या 4 दिवसांत आणखी पुरावे गोळा केले. उद्या सकाळी 11 वा. पत्रकार परिषद घेऊन मी या पुराव्यांचा खुलासा करेन. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धनंजय मुंडे यांची पाठराखण करता येणार नाही.
मी या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पण धनंजय मुंडे या दोन्ही नेत्यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. विशेषतः धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईपर्यंत संतोष देशमुख प्रकरणात न्याय होणार नाही. त्यांच्यासारखे लोक मंत्री म्हणून वाल्मीक कराड व कैलास फड सारख्या लोकांना मोठे करतात. दहशत माजवतात, अत्याचार करतात. त्यामुळे असे लोक आम्हाला मंत्री म्हणून मान्य नाहीत.
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, मी आतापर्यंत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना धनंजय मुंडे यांचा राख घोटाळा, काळा पैसा त्यांच्या खात्यात कसा आला? सरकारी कंपनीचा फायदा एका मंत्र्याला कसा झाला? हे दाखवले. त्यांच्या जमिनी व आर्थिक व्यवहारही दाखवून दिले. पण काहीही झाले नाही. पण उद्या पत्रकार परिषदेत मी त्यांच्या भ्रष्टाचाराचा खूप मोठा खुलासा करणार आहे. यंत्रणांचा गैरवापर कशा पद्धतीने केला जातो हे देखील मी सांगणार आहे. विशेषतः हे पुरावे मी भगवानगडावरही पाठवून गडाने धनंजय मुंडे यांना दिलेला पाठिंबा मागे घेण्याची विनंती करणार आहे. माझ्या पुराव्यानंतर भगवान गडाने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली तर समस्त महाराष्ट्र गडाला नमन करेल.
नामदेवशास्त्री महाराज खरेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या मागे असतील तर त्यांनी देशमुख कुटुंबीयांना मिळणाऱ्या न्यायाच्या मार्गातील अडचणी दूर कराव्यात. धनंजय मुंडे त्यांच्या मार्गातील सर्वात मोठे विघ्न आहे. ते मंत्रिपदावर असेपर्यंत या प्रकरणात न्याय होणार नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचे काम आता भगवानगडानेच करायला हवे. त्यानंतरच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेल. माझ्या हाती आलेले सर्व पुरावे अतिशय धक्कादायक आहेत. हे पुरावे जनतेपुढे येतील तेव्हा जनताच सरकारला मोठा निर्णय घेण्यास भाग पाडेल, असे दमानिया म्हणाल्या.
अंजली दमानिया यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज नेते छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. मला छगन भुजबळ यांच्याविषयी कोणतेही भाष्य करायचे नाही. ते बहुतेक वाट पाहत असतील की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर त्यांचे मंत्रिपद आपल्याला मिळे. हे सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत. त्यामुळे भुजबळ हे मुंडेंच्या राजीनाम्याची वाट पाहत असतील, असे त्या म्हणाल्या.