नवी दिल्ली- कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेत बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील शिर्डी येथील नवीन मतदारांचा प्रश्न उपस्थित केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जितके 5 वर्षात मतदार जोडले गेले नाहीत तितके शेवटच्या 5 महिन्यात जोडले गेले, असे म्हणत राहुल गांधी यांनी शिर्डी येथील नवीन मतदारांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, शिर्डीच्या एका इमारतीमध्ये 7 हजार नवमतदार वाढले. मी कुठला आरोप करत नाही परंतु काही ना काही संशयास्पद आहे हे दिसत आहे. हिमाचल प्रदेशातील लोकसंख्येइतके मतदार नव्याने समाविष्ट होतात. आम्ही निवडणूक आयोगाकडे लोकसभा मतदार यादी, नाव आणि पत्ते मागितले आहेत. नवे मतदार बहुतांश अशा मतदारसंघात वाढले आहेत जिथे भाजप पराभूत झाली होती. हा डेटा आमच्याकडे आहे. तसेच निवडणूक आयुक्तांची निवड पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांच्या कमिटीने करायची होती. सरन्यायाधीशांना कमिटीमधून का हटवण्यात आले?, असा सवाल देखील राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिर्डीमधील मुद्दा जो उपस्थित केला आहे, हा प्रकार शिर्डी मतदारसंघातील लोणी येथील मतदार केंद्रावरील आहे. शिर्डी मंतदारसंघाच्या कॉंग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे या त्यांच्या सहकाऱ्यांसह लोणीतील मतदार केंद्रावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी तिथे एका तरुणीची विचारपूस केली. तुम्ही कुठल्या आहात असे विचारले असता तरुणीने पीएमसी असे उत्तर दिले. तिच्या उत्तरावर पीएमसी गावाचे नाही, असे घोगरे म्हटल्यानंतर तरुणीने लोणी असे उत्तर दिले. लोणी खुर्द की ब्रुदूक? असे प्रश्न घोगरेंच्या सहकाऱ्याने विचारल्याने तरुणी भांबावून गेली. त्यानंतर तुम्ही नेमक्या कुठच्या? असे घोगरेंनी विचारल्यानंतर, त्यावर धुळे असे उत्तर तरुणीने दिले. तुम्ही धुळ्याच्या आहात, तर मग इकडे मतदान कसे? इथे कॉलेजला आहे का? कोणत्या कॉलेजला? असे अनेक प्रश्न विचारल्याने तरुणी आणखीच गोंधळून गेली.
असेच अनेक तरुण तरुणींनी या मतदान केंद्रावर बोगस मतदान केल्याचे उघडकीस आले होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटूळ यांच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असल्याचे या तरुणीने माहिती दिली होती. मात्र, जेव्हा या तरुणीला ओळखपत्रासह इतर कागदपात्रांबद्दल विचारणा केली असता या तरुणीने मतदान केंद्रावरून काढता पाय घेतला होता.

