शिरष्णे (ता.बारामती)-ठेकेदार राजकारणातून पदाधिकारी झाल्याने जनतेमध्ये चीड निर्माण होते, अर्थातच त्यामुळे पक्ष प्रमुख म्हणून आम्ही जनतेच्या त्या प्रचंड रोषाचे धनी होतो. याशिवाय अधिकाऱ्यांनाही सरकारी कामे दर्जेदार करण्यास अडथळा निर्माण होतो.हा दुहेरी तोटा आता मला सहन होत नाही.मी आठ वेळा आमदार झालो, यापुढे मी कसाही आमदार म्हणून सभागृहात जाईल, परंतु ठेकेदार लोकांना राजकारणाचे दरवाजे बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अशी नवीन राजकीय भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरष्णे (ता.बारामती) येथील शेतकरी मेळाव्यात जाहीर केली. यावेळी उपस्थितांनी मात्र एकच टाळ्यांचा कडकडाट करीत पवारांच्या भूमिकेला पाटींबा दिला.
शिरष्णे (ता.बारामती) येथे श्री स्वामी समर्थ सहकारी दूध उत्पादक संस्थेने नव्याने दूध बल्क कुलरची उभारणी केली आहे. त्या कामी संस्थेचे प्रमुख संतोष जाधव यांनी पुढाकार घेतला होता. या कुलरच्या उद्धाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते. बारामतीसह राज्यात ठेकेदार राजकारणातून पदाधिकारी होण्यासाठी इच्छुक असतात. ही संख्या मोठी होत चालली आहे. अर्थात हे लोकांना आवडत नसल्याचे लोकसभा आणि विधासभा निवडणूत प्रखरशाने जाणवले, असे सांगून पवार म्हणाले,“ ज्यांना राजकारण अथवा कार्यकर्ता व्यहाचे आहे, त्यांनी ठेकेदार क्षेत्रात यायचे नाही.तसे झाल्यास नवीन आणि गावपातळीवर चांगले पक्षाचे काम करणाऱ्या चेहर्यांना संधी मिळेल. परिणामी अधिकाऱ्यांनाही दर्जेदार काम करणे सोईचे होईल. जनतेमध्येही राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाची प्रतिमा उंचविण्यास मदत होईल.“ राष्ट्रवादीच्या बुथ कमीटीमध्ये ज्या सदस्यांनी चांगले काम केले, त्यांच्या मताचा अधिकाधिक विकास प्रक्रियेत विचार केला जाईल, असे पवार यांनी जाहिर केले.

