:- पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून 9.12 कोटी रुपयांची फसवणूक
सोनीपत(हरियाणा)-बॉलीवूड अभिनेते श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांच्याविरोधात लखनौ, यूपीमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांशिवाय गोमती नगर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये आणखी 5 जणांची नावे आहेत. या सर्वांनी पत सहकारी संस्थेच्या 45 गुंतवणूकदारांची 9.12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या सर्वांनी पीडितांना 6 वर्षात दुप्पट पैसे देण्याची ऑफर दिल्याचा आरोप आहे. कलाकारांव्यतिरिक्त, पीडित अनीस अहमदने कंपनीच्या कोअर टीम सदस्य डॉ. उत्तम सिंग राजपूत, व्यवस्थापक समीर अग्रवाल यांच्यासह एकूण 7 जणांविरुद्ध बीएनएस कलम 409 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.ही सोसायटी गेल्या सहा वर्षांपासून लोकांकडून पैसे वसूल करत होती, मात्र लोकांनी पैसे परत मागितल्यावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पळ काढला. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांनी सोसायटीच्या गुंतवणूक योजनांची वकिली केली होती आणि अभिनेता सोनू सूदने त्याच्या एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.याआधी हरियाणामध्येही गुन्हा दाखल झाला होता. या मल्टी लेव्हल मार्केटिंग घोटाळ्यात हरियाणातील सोनीपतमध्ये बॉलिवूड कलाकारांसह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एफआयआरमध्ये आरोप करण्यात आला आहे की, 16 सप्टेंबर 2016 रोजी हरियाणा आणि लखनौसह अनेक राज्यांमध्ये ह्युमन वेलफेअर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीने काम करण्यास सुरुवात केली. ही संस्था मल्टी-स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी कायद्यांतर्गत काम करत होती आणि इंदूर, मध्य प्रदेश येथे नोंदणीकृत होती. संस्थेने गुंतवणूकदारांना उत्कृष्ट व्याजदराचे आमिष दाखवले. गुंतवणूकदारांना आरडी आणि एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची ऑफर देण्यात आली.

