पुणे : ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कीर्तने अँड पंडित संस्थेच्या वतीने ‘रन फॉर द रिपब्लिक’ मॅरेथॉन २०२५ चे नुकतेच आयोजन केले होते. कर्वे रस्त्यावरील कीर्तने अँड पंडित संस्था, दशभुजा गणपती, करिष्मा सोसायटी चौक, कर्वे रोडने कर्वे पुतळा, शिवाजी महाराज चौक, कर्वे रोडने पुन्हा कीर्तने अँड पंडित या मार्गाने ही मॅरेथॉन झाली. तीन किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये संस्थेतील सर्व पदाधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
कीर्तने अँड पंडितचे सीए मिलिंद लिमये, सीए पराग पानसरे आदी उपस्थित होते. बाबू बावधने, यश दाते, श्रवण बिश्नोई व धैवत आपटे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाने, तर इतर सर्व सहभागींना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. स्नेहा पाटोळे व सहकाऱ्यांनी मॅरेथॉनचे यशस्वी संयोजन केले.
सीए मिलिंद लिमये म्हणाले, “लोकशाही उत्सव साजरा करण्यासाठी व सर्वांमधील एकात्मता जपण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘रन फॉर रिपब्लिक’ मॅरेथॉनचे आयोजन केले होते. संस्थेतर्फे दरवर्षी आजच्या दिवशी सामाजिक उपक्रम आयोजित केला जातो. यापूर्वीही ‘मेरा तिरंगा मेरा अभिमान’ ध्वज संकलन मोहीम, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम राबविण्यात येतात.”