पुणे: गौतम बुद्ध, भगवान महावीर आणि संत कबीर या महामानवांच्या मूल्यविचारांच्या अभ्यासक प्रा. भारती जाधव यांची विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समितीच्या अध्यक्षपदी, तर औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्रा. सायली गोसावी यांची सचिवपदी निवड करण्यात आल्याची माहिती विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.
स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांबरोबरच मानवता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी समितीच्या वतीने विविध स्वरूपाचे कार्यक्रम आणि उपक्रम राबविले जातात, असे रोकडे यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. संजय गायकवाड आणि प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी प्रा. जाधव व प्रा. गोसावी यांचे अभिनंदन केले.