विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
पुणे-
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती अशी ओळख असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही माघ शुध्द चतुर्थीला गणेश जन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गणेशयाग, अथर्वशीर्ष पठण, भजन सेवा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गणेश चतुर्थीनिमित्त मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी सात वाजता याग करण्यात आला. यावेळी सरस्वती भजनी मंडळांने सादर केलेल्या भजनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दुपारी बारा ते एक या दरम्यान अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले होते. तर सायंकाळी आकर्षक सजावटीसह गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोश करत आणि फुलांची उधळण करीत गणपती पालखी (नगर प्रदक्षिणा) सोहळा संपन्न झाला. सायंकाळी पुणे महानगर संघचालक मा. रविंद्र वंजारवाडकर यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली, याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे यांच्यासह विश्वस्त, कार्यकर्ते व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मूषकाची फुलांनी आकर्षक सजावट
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरा’त श्री गणेशाचे वाहन असणाऱ्या मूषकाची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. बाप्पाच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूनी जास्वंदीच्या पांढऱ्या फुलांनी आणि गुलाब पाकळ्यांनी साकारलेले मूषक भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. त्यापुढे सूर्यफुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.