अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि श्री शिवाजी मराठा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५ व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचा समारोप
पुणे : मराठी भाषा येत नाही मराठी भाषा संपत आहे असे म्हणतात, परंतु दोन दिवसात मोठ्या संख्येने मुले साहित्य संमेलनात आली ते पाहून विश्वास वाटतोय की मराठी भाषा अजूनही संपलेली नाही. फक्त आपल्या हृदयात डोकावून त्याचे मेंदूशी नाते जोडायला पाहिजे. पुस्तक हातात येते तेव्हा आपण अंतर्मुख होतो आणि माहिती मिळून चिंतनाची प्रक्रिया होते. वाचन, मनन, चिंतन या ज्ञान मिळवण्याच्या ३ पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढल्यानंतरच माणूस शहाणा होतो, असे मत बालसाहित्यकार स्वाती राजे यांनी व्यक्त केले.
अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि श्री शिवाजी मराठा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ५ वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या प्रांगणात करण्यात आले होते. साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रसेवा दलाचे सचिव शिवाजी खांडेकर, शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राजन लाखे, बाल अभिनेता शर्व गाडगीळ, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष सुरेश देसाई यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
अण्णा थोरात म्हणाले, मुलांमध्ये साहित्याची गोडी निर्माण व्हावी, यासाठी साहित्य संमेलना सारखे कार्यक्रम व्हायला हवेत. यानिमित्ताने शालेय विद्यार्थी भाषेच्या आणखी जवळ आले आणि साहित्यातले विविध पैलू त्यांना जवळून अनुभवता आले. मराठी साहित्य जगण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
राजन लाखे म्हणाले, पालकांनी विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल देण्यापेक्षा आधी पुस्तके द्यावीत. विद्यार्थ्यांनी देखील मोबाईल वापरताना किती वापरायचा याची मर्यादा ठेवावी, असेही त्यांनी सांगितले. शर्व गाडगीळ आणि शिवाजी खांडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले. विनोद वाघ यांनी आभार मानले.