सेवा वस्तीतील ७४० मुला-मुलांनी २४७४० सूर्यनमस्कार घातले.
पुणे-कोथरूड
रविवार, २ फेब्रुवारी-
सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या वतीने रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार यज्ञ कार्यक्रम उत्साहात पार पडला.कोथरूड येथील जीत मैदानावर सकाळी ८ ते १० या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात विविध सेवा वस्त्यांतील विद्यार्थी,पालक,स्थानिक नागरिक तसेच विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे महापारेषणचे अधिक्षक अभियंता संदीप हाके आणि सेवा आरोग्य फाऊंडेशन संस्थेचे संचालक मनोज देशमुख,डॉ सतीश जोशी,डॉ हर्षदा पाध्ये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि भारत माता प्रतिमा पूजन करून झाली.त्यानंतर सामूहिक प्रार्थनेने सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
विशेष म्हणजे वस्तीतील ७४० जणांनी मिळून २४,७४० सूर्यनमस्कार घालून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ नारायण देसाई,संस्थापक सदस्य आणि कार्यकारी संचालक, सोसायटी फॉर इकोलॉजिकल रिस्टोरेशन – इंडिया,कार्यकारी परिषद सदस्य मेन्सा इंडिया गिफ्टेड चाईल्ड प्रोग्राम यांनी सूर्यनमस्काराचे तंत्र,फायदे आणि त्याचे जीवनातील महत्त्व यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.उपस्थितांनी नियमित सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प यावेळी केला.
काही उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या सहभागींना प्रातिनिधिक स्वरूपात पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सेवा आरोग्य फाऊंडेशनचे संचालक मनोज देशमुख,डॉ हर्षदा पाध्ये,डॉ सतीश जोशी उपस्थित होते.प्रास्ताविकात डॉ सतीश जोशी यांनी सेवा आरोग्य फाऊंडेशनतर्फे घेत असलेल्या विविध आरोग्य तसेच संस्कार प्रकल्पांची माहिती दिली.प्रीती पाटकर यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशवंत ववले,दत्ताजी वाळवेकर,दिलीप लिमये,विवेक बाकरे,प्रीती पाटकर,वैशाली चव्हाण,निरंजनी शिरसट,मानसी जाधव आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला संस्थेचे कर्मचारी,कार्यकर्ते,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तसेच विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते.
समृध्दी वर्ग प्रकल्प समन्वयक निरंजनी शिरसठ यांनी सेवा आरोग्य टीम च्या सहाय्याने कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.
कार्यक्रमाची सांगता कल्याण मंत्राने झाली.सर्व मुला मुलींना प्रमाणपत्र देण्यात आली.खाऊ वाटप करण्यात आला.