पुणे : ‘या दिशहीन जगण्यास थारा हवा, आपला आपल्याला किनारा हवा, कोण जाणे कधी वेळ येईल ती वाट पाहिन पण तोच तारा हवा’ अशा मुक्तछंदातील ओळी सादर करून गझल प्रतिभा पुरस्काराने सन्मानित सानिका दशसहस्र यांनी आपल्या मनातील भावना प्रकट केल्या. गझल माझ्या मनात रुतलेली आहे असे सांगून ‘वर्तुळातल्या काट्यांवरती अखंड धावत आहे का, वेळ बदलण्यासाठी कोणी इतके झगडत आहे का’ ही गझल पेश करून गझल प्रेमींची दाद मिळविली.
रंगत-संगत प्रतिष्ठान व करम प्रतिष्ठान यांच्यावतीने कवयित्री, गझलकारा सानिका दशसहस्र यांना गझल प्रतिभा पुरस्काराने आज (दि. 2)
गौरविण्यात आले. त्या वेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना कविता आणि गझलेच्या माध्यमातून भावभावना उलगडून दाखविल्या. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे वितरण रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, मैथिली आडकर, प्रज्ञा महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
प्रास्ताविकात प्रमोद आडकर म्हणाले, युवा कलाकारांच्या पाठीवर थाप देऊन त्यांना त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
गझलकाराने ‘गझल’-‘गजल’ शब्दोच्चाराच्या वादात अडकू नये : भूषण कटककर
पुरस्कारामागील भूमिका विशद करताना प्रसिद्ध गझलकार भूषण कटककर म्हणाले, कवींमधून अधिक उर्जादायक काव्यनिर्मिती व्हावी या करीता पुरस्कार दिला जात असून सानिका यांच्या गझला साध्या-सोप्या भाषाशैलीत परंतु सखोल अर्थ दडलेल्या असतात. आक्रोश किंवा आक्रस्ताळेपणाने मांडणी न करता मनोव्यवहारांचा खेळ त्यांच्या गझलातून मांडला जातो. ‘गझल’ किंवा ‘गजल’ या शब्दोच्चाराच्या वादत न पडता गझलकाराने आपली निर्मिती बहरू देणे आवश्यक आहे. गझल आणि कविता यांची मांडणी वेगळी असल्याचे सांगून कटककर म्हणाले, गझल लिहिताना शब्दांची मांडणी जाणिवपूर्वकपणे वृत्तात करावी लागते. त्यामुळे कवी पेक्षा गझलकाराचे परिश्रम अधिकच असतात. साहित्य संमेलनात गझलकारांसाठी स्वतंत्र कट्टा देणे अगात्याचे असावे, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली.
गझल लेखानासाठी मिळालेला हा पहिला पुरस्कार असून या पुरस्काराने अधिक परिपक्व लिखाणाचे भान जागे केले असल्याचे सानिका दशसहस्र म्हणाल्या.
परिचय माधुरी डोंगळेकर यांनी करून दिला तर मानपत्राचे वाचन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले. सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे, वैजयंती आपटे यांनी केले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर आयोजित निमंत्रितांच्या गझल संमेलनात प्रभा सोनवणे, मिलिंद छत्रे, अमृता जोशी, नूतन शेटे, भालचंद्र कुलकर्णी, शैलजा किंकर, योगेश काळे, स्मिता जोशी-जोहरे, डॉ. मृदुला कुलकर्णी, सुहास घुमरे, रुपाली अवचरे यांचा सहभाग होता. संमेलनाचे सूत्रसंचालन निरुपमा महाजन यांनी केले.