- गणेश जयंतीनिमित्त विधायक कार्य करणाऱ्या गणेश मंडळांचा कृतज्ञता सन्मान
पुणे : गणेश मंडळाच्या माध्यमातून कार्यकर्ता घडतो, मोठा होतो, त्याची प्रगती होते. सामाजिक संदेश देणारे देखावे, सामाजिक उपक्रम, समाज सुधारणा यातून गणेश मंडळांनी परंपरा जपत मोठ्या प्रमाणात विधायक कार्ये केली आहेत. अशा मंडळांच्या विधायक कार्याची दखल सरहद संस्थेने घेतली आहे हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार भीमराव तापकीर यांनी केले.सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त घेण्यात येणाऱ्या 98 कार्यक्रमांतर्गत गणेश जयंतीचे निमित्त साधून सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्याचे उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांचा कृतज्ञता सन्मान सोहळा सरहद, परिवारातर्फे सरहद स्कूल, कात्रज येथे आयोजित करण्यात आला होता. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार तापकीर यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.हिराबाग मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, अखिल मोहननगर मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ, शिवांजली मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ या गणेश मंडळांना आज गौरविण्यात आले. आमदार भिमराव तापकीर, वरिष्ठ पोलिस निरिक्षक सावळाराम साळगावकर, सरहदचे विश्वस्त शैलेश वाडेकर, विश्वस्त अनुज नहार, दिलीप राऊत, मयूर मसूरकर, मनिषा वाडेकर, कविता वानखेडे, सुजाता गोळे, निर्मला नलावडे, पल्लवी पासलकर, गीता खोत आदी उपस्थित होते.संजय नहार यांच्या कार्याचे कौतुक करून तापकीर पुढे म्हणाले, सरहद संस्थेच्या माध्यमातून समाजभान जपणारे, दर्जेदार कार्य केले जात आहे. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांवर परंपरा जोपासण्याचे संस्कार केले जात आहेत. या संस्थेत शिक्षण आणि संस्कारांचा संगम साधला जात आहे.शैलेश वाडेकर म्हणाले, अनेक गणेश मंडळे सामाजिक उपक्रम हाती घेत आहेत. पुण्यातील गणेश मंडळाच्या माध्यमातून पुण्यात घडणारे सामाजिक कार्य मोठे असून त्यातून चांगल्या समाजाची निर्मिती होईल आणि इतर गावातील मंडळेही समाजकार्याची प्रेरणा घेतील. मंडळांच्या एकत्रीकरणातून त्यांची ताकद वाढेल. या मंडळांचा आवाज दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातही उमटावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. गणेश मंडळांच्या विधायक कार्याचे कौतुक करून सावळाराम साळगावकर म्हणाले, या भागातील गणेश मंडळांनी एकत्र येऊन मिरवणूक काढण्याच्या निर्णयाने शांतता व सुव्यस्था राखण्यास पोलीस दलाला सोपे जात आहे. मंडळांनी ध्वनी प्रदुषण होऊ नये यासाठीही कायम सहकार्यच केले आहे. मंडळांच्या कार्यामुळे समाजात सलोखा राखण्यास मदत होते आहे. मंडळांच्या अफाट जनसंपर्कामुळे अनेकदा आमच्या खात्याला उपयोग झाला आहे. सरहद संस्थेचे सामाजिक क्षेत्रात असलेले योगदान मोलाचे आहे.हिराबाग मित्र मंडळाच्या वतीने स्मरण थोरात यांनी सन्मान स्वीकारला तर एकता मित्र मंडळाचा सन्मान शुभम वानखेडे यांनी, अखिल मोहननगर मित्र मंडळाच्या वतीने शंतनु येवले, साईनाथ मित्र मंडळ संतोष निकम, फाईव्ह स्टार मित्र मंडळाचा विजय क्षीरसागर तर शिवांजली मित्र मंडळाचा सन्मान अंकुश जाधव यांनी स्वीकारला.मंडळांच्या वतीने अंकुश जाधव, विकास काटे, विजय क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचाल वैशाली शिंदे यांनी केले तर आभार अमित सालेकर यांनी मानले.