अखिल मंडई मंडळात गणेश जन्म सोहळा साजरा
पुणे : कैलास पार्वती आनंद झाला…तेजस्वी बालक जन्मास आला..सुखकर्ता दु:खहर्ता म्हणतात तुला, जो बाळा जो जो रे जो…विघ्नहर्त्याला नमन करु, बाप्पा मोरया चा जयघोष करु, बाळाचे नाव गणेश ठेऊ जो बाळा जो जो रे जो…असा पाळणा म्हणत अखिल मंडई मंडळात माघ शुद्ध चतुर्थीला गणेशजन्म सोहळा उत्साहात साजरा झाला.
यावेळी मोठ्या संख्येने गणेशभक्त यावेळी गणेशजन्म सोहळ्यात सहभागी झाले होते. गणेशजन्म सोहळ्यानिमित्त मंदिरात अष्टविनायक गणपतीची आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. शारदा गजाननाची प्रसन्न मूर्ती कॅमेरात कैद करण्यासाठी भाविकांनी यावेळी गर्दी केली.
अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, विश्वास भोर, राजेश कारळे, तुषार शिंदे, चेतन वाघमाले, सुचेता थोरात, जान्हवी शाह, सुरज थोरात उपस्थित होते. देविका थोरात यांनी पाळणा गायला.
अण्णा थोरात म्हणाले, गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन मंदिरात करण्यात आले होते. यामध्ये सकाळी ६ वाजल्यापासून अभिषेक, गणेश याग तर सायंकाळी पालखी पूजन आणि नगर प्रदक्षिणा मिरवणूक संपन्न झाली. यंदा वैशिष्ट्यपूर्ण फुलांची सजावट करण्यात आली होती, यामध्ये अष्टविनायक साकारण्यात आले आहेत.