मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्टचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी (१२५) वर्ष ; दृष्टीहीन विद्यार्थींनीनी केले अथर्वशीर्ष पठण
पुणे : मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी (१२५) वर्षी श्री गणेश जन्मानिमित्त महागणपतीची पालखीतून नगरप्रदक्षिणा आयोजित करण्यात आली. तसेच गणेश जन्माच्या निमित्ताने पूना ब्लाइंड स्कूल मधील दृष्टिहीन विद्यार्थ्यींनींनी अथर्वशीर्ष पठण देखील केले. मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या देखील नगरप्रदक्षिणेत सहभागी झाल्या होत्या.
गणेश जयंती उत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. महाराष्ट्राच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पारंपारिक गणेश जन्मोत्सवात महिला कार्यकर्त्यां सोबत सहभाग घेतला. यावेळी उद्योजक आणि रौप्यमहोत्सवी वर्षाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, राजेंद्र बाठिया, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित यांसह व्यापार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. गणेश यागासह विविध धार्मिक उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. नगरप्रदक्षिणा पालखी मिरवणुकीत लोणकर बंधु नगारा वादन, श्री गजलक्ष्मी ढोल पथक, शिवमुद्रा ढोल पथकी – शिवराज्याभिषेक रथ, गंधर्व ब्रास बॅण्ड यांसह गणेशभक्त पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. तुळशीबाग गणेश मंदिर मार्ग गणपती चौक, काकाकुवा मॅन्शन, लिंबराज महाराज चौक, बँक ऑफ महाराष्ट्र, शनिपार चौक, जिलब्या मारूती गणपती, महात्मा फुले मंडई, बाबूगेनू चौक, समाधान चौक, लक्ष्मी रोड, गणपती चौक येथून तुळशीबाग गणेश मंदिर येथे नगरप्रदक्षिणा सांगता झाली.