जोखीम लक्षात घेऊन गुंतवणूक करण्याचा ‘इन्फ्लूएंसर’चा सल्ला
पुणे-“तरुणांमध्ये ‘सोशल मीडिया ‘इन्फ्लूएंसर’ बनण्याची इच्छा असल्याचे दिसून येते. तुम्हाला याच क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर खुशाल करा; मात्र सुरुवातीला त्यासाठी किती गुंतवणूक करायची, याचा गांभीर्याने विचार करा. त्यातून रिटर्न किती मिळणार, जोखीम किती, याचा विचार करावा,” असे आवाहन सोशल मीडिया ‘इन्फ्लूएंसर’ने शनिवारी पुण्यात केले.
तिसऱ्या मराठी विश्व संमेलनात दुसऱ्या दिवशी समाज माध्यमातील प्रभावी व्यक्तीमत्त्वांच्या (इन्फ्लूएंसर) परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सीए रचना रानडे, अथर्व सुदामे, पवन वाघुळकर, ओंकार व शार्दुल कदम, अरूण प्रभुदेसाई आदी सहभागी झाले होते. त्यांच्याशी ज्येष्ठ निवेदक सुनंदन लेले यांनी संवाद साधला. ‘सोशल मीडिया केवळ मनोरंजनाचे किंवा वेळ घालवण्याचे साधन नाही. त्याचा उपयोग लोकांच्या ज्ञानवृद्धीसाठी, सामाजिक समस्या समजून घेण्यासाठी आणि व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी होऊ शकतो. सोशल मीडिया वापरकर्त्यांना मानसिक स्वास्थ्याची काळजी घेण्याची गरज आहे आणि तो एक स्थिर मानसिकतेसह वापरणे आवश्यक आहे,’ असा सूर यावेळी ‘इन्फ्लूएंसर’ने आळवला.
अथर्व सुदामे म्हणाला, ‘रिल्स बनविताना दहा ते पंधरा सेंकदात प्रभावी कंटेट देण्यासाठी आपल्या भाषेचा उपयोग होतो. मातृभाषेत चांगल्या पद्धतीने व्यक्त होता येते. आपल्या भाषेत ती मजा आहे.’ पवन वाघुळकर म्हणाला. ‘सोशल मीडिया एक अत्यंत प्रभावशाली माध्यम आहे. आपण त्याचा वापर कसा करतो, यावर त्याचा परिणाम अवलंबून आहे. सोशल मीडिया जर योग्य पद्धतीने वापरला तर ते एक अमूल्य साधन ठरू शकतो.
रचना रानडे म्हणाल्या. “अर्थ विषयक चॅनल सुरू करताना लोकांना ते आवडेल का, असा प्रश्न मनात आला होता. मात्र, प्रत्यक्ष चॅनेल सुरू केल्यानंतर लोकांची त्यातील रुची दिसून आली. आपले लोकही मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीकडे वळाले असून, योग्य मार्गदर्शनासाठी ते माध्यम शोधत असतात.
‘सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मानवत दडपण असते. मात्र, दहा-पंधरा सेंकदांच्या रिल्सने लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते, त्यांचे मन हलके होते, याचा आम्हाला आनंद आहे,’ अशी भावना अरूण प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली.