पुणे, दि.१ : पुणे विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत पेरणे गावाच्या हद्दीत छापा मारुन १ हजार १६८ ग्रॅम गांजासह इतर साहित्य असा एकूण ३६ हजार ४१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांनी दिली आहे.
या अनुषंगाने सूरज अशोक हिंगे वय १९ वर्षे रा. शिरुर कासार रोड, ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर यांच्याविरुद्ध अंमली औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ च्या कलमानुसार विभागीय भरारी पथक पुणे कार्यालयात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईत निरीक्षक नरेंद्र थोरात, दुय्यम निरीक्षक विराज माने व धीरज सस्ते, प्रताप कदम, सतीश पोंधे, रणजीत चव्हाण, शशीकांत भाट, अमोल दळवी व राहुल तारळकर सहभागी झाले. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात करीत आहेत.