श्री विनायक जन्मोत्सव ; गणेशाचे वाहन असलेल्या मूषकांची फुलांमध्ये मंदिरावर आकर्षक आरास ; पीएनजी ज्वेलर्सतर्फे गणपती बाप्पाला दहा पदरी भव्य ‘कमळ हार’
पुणे : कुणी अमोद घ्या, कुणी अमोघ घ्या, या ग सयांनो या ग या… असे पाळण्याचे स्वर आणि जय गणेश दगडूशेठ गणपती बाप्पा… चा जयघोष श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात झाला. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही माघ शुध्द चतुर्थीला गणेश जन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा श्री गणेशाचा विनायक अवतार आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे श्री गणेश जन्म सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही सुवर्णपाळण्यात पार पडला. यावेळी मृणालिनी रासने, ज्योती सूर्यवंशी, शारदा गोडसे, अर्चना भालेराव यांसह महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री गणेशाचे वाहन असलेल्या मूषकांची फुलांमध्ये मंदिरावर आकर्षक आरास करण्यात आली होती. मंदिरात शनिवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला. पहाटे ४ ते ६ यावेळेत स्वराभिषेक सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे व सहकारी यांनी श्रीं चरणी अर्पण केला. त्यानंतर सकाळी ६ ते ११ आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ६ यावेळेत गणपती सूक्त अभिषेक करण्यात आला.
सकाळी ८ ते ११.३० ते दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत गणेशयाग आणि दुपारी १२ वाजता गणेशजन्माचा सोहळा थाटात साजरा झाला. सायंकाळी ६ वाजता नगरप्रदक्षिणा मिरवणूक, रात्री ८.३० वाजता श्रींची महाआरती आणि रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर झाला. भाविकांनी लाखोंच्या संख्येने पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती.
- गणरायाला १ किलोचा १.०५ कोटी रुपयांचा ‘कमळ हार’ अर्पण
पीएनजी ज्वेलर्सतर्फे गणपती बाप्पाला दहा पदरी भव्य ‘कमळ हार’ अर्पण करण्यात आला. श्रद्धा आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा पुढे नेत पीएनजी ज्वेलर्सने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दहा पदरी भव्य ‘कमळ हार’ अर्पण करत पुन्हा एकदा अध्यात्म आणि कलेप्रती आपली निष्ठा दर्शवली आहे. एक किलो वजनाच्या या हारामध्ये ४०० हून अधिक उपरत्ने जडवलेली असून हा हार म्हणजे अखंड भक्तीचे प्रतीक आहे. ‘कमळ हार’ हा पवित्र कमळाच्या प्रेरणेतून साकारलेला सोन्याच्या दागिन्याचा उत्कृष्ट नमुना आहे. पीएनजी ज्वेलर्सचे संस्थापक आणि गणपती भक्त दाजीकाका गाडगीळ यांनी ही अर्पण परंपरा सुरू केली. या कमळ हाराची किंमत १.०५ कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने यांनी दिली.
‘कमळ हार’ हा अत्यंत नाजूकपणे साकारलेला दागिन्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. यात अनेक आध्यात्मिक प्रतीके जडविण्यात आली आहेत. या हाराच्या मध्यभागी असलेले तेजस्वी कमळ शुद्धतेचे प्रतीक आहे, त्याला दोन मोरांचा आधार मिळाला आहे. मोर हे दिव्य वैभव आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. हाराच्या आठ पदरांची रचना रुद्राक्षांच्या मण्यांसारखी आहे. ही रचना आध्यात्मिक संरक्षण आणि समतोलाचे प्रतीक दर्शवते. या हाराला भक्तीचा अनोखा स्पर्श देण्यासाठी गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदकाच्या आकारातील गडद लाल रत्नांचा समावेश करण्यात आला आहे. यातून परंपरा आणि कलात्मक कौशल्याचा सुंदर मिलाफ घडवला आहे. हा अद्वितीय दागिना २० कुशल कारागीरांनी २५ दिवसांच्या परिश्रमाने साकारला आहे. या हाराच्या निमित्ताने पूर्ण भक्तीभावाने आणि समर्पित भावनेने त्यांनी हा सुंदर दागिना घडवला, असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.