पुणे, दि. १ फेब्रुवारी : विश्व शांती व मानव कल्याणासाठी जीवन समर्पित करणारे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष, जागतिक शांततेचे प्रचारक, विश्वशांती दूत डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा लंडन येथील महाराष्ट्र मंडळाने मानपत्र देऊन त्यांचा शनिवार, १ फेब्रुवारी रोजी विशेष सत्कार केला. मंडळाचे अध्यक्ष वृषाल खांडके, संस्थापक विश्वस्त वैभव खांडगे आणि चेअर ट्रस्टी सुशिल गायकवाड यांनी पुण्यात येऊन एमआयटी डब्ल्यूपीयूमधील डॉ. कराड यांच्या कार्यालयात सत्कार केला. यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस उपस्थित होते.
भारत अस्मितेचे औचित्स साधून लंडन येथील महाराष्ट्र मंडळाने हा विशेष सत्कार केला आहे. डॉ. कराड यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण, मानवता आणि संस्कार यांसाठी समर्पित केले. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून विज्ञान आणि अध्यात्माचा संगम घडवून शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण करण्याचे महान कार्य केले आहे. या सर्व कार्यांची दखल घेऊन त्यांनी हा सत्कार केला आहे.