महाश्वेता जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यात डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उत्सवमूर्तींना पुरस्काराने गौरविण्यात आले
पुणे, दि. ३१ : महाश्वेता जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित राहून पुरस्कार प्रदान केले. आपल्या भाषणात समाजातील परिवर्तनासाठी अशा पुरस्कारांचे महत्त्व अधोरेखित करत डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ” समाजातील सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांना सन्मानित करणे ही काळाची गरज आहे. अशा पुरस्कार सोहळ्यांमुळे समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना नवी ऊर्जा मिळते.”
याप्रसंगी, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्योगपती श्री. जवाहर मोतीलाल वीरचंद शहा, श्री. ललित गांधी, श्री. राकेश लालचंद शहा, श्री. दीपक विनोद कुमार शहा, श्री. राजेश भोगीराज शहा, डॉ. राजेश हिरालाल शहा, श्री. युवराज शांतीलाल शहा, श्री. विलास जयंतीलाल शहा, सौ. शर्मिला राजेंद्र सुराणा, सौ. अनिता रणजीत शहा, या पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
जैन समाजाच्या कार्याचा गौरव
डॉ. गोऱ्हे यांनी जैन समाजाच्या कार्याची विशेष दखल घेतली आणि त्यांचे सामाजिक योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगितले. त्यांनी जैन समाजाच्या वैद्यकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “लातूरचा भूकंप असो, कोल्हापूरची अतिवृष्टी असो किंवा वैद्यकीय सेवा—जैन समाज नेहमीच पुढे असतो.”
त्या पुढे म्हणाल्या, “समाजातील प्रत्येकाने आपले उत्पन्नाचे एक ते दोन टक्के भाग समाजोपयोगी कार्यासाठी द्यायला हवा. अशा योगदानामुळे माणुसकी अधिक जिवंत राहते. वाचनालय, शिक्षण आणि आरोग्य सेवा यांसाठी मदत करणे आवश्यक आहे.”
चांगल्या कार्यावर विश्वास ठेवा
डॉ. गोऱ्हे यांनी समाजातील सकारात्मक बदलांसाठी मानसिक धैर्य आणि चिकाटी महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, “चांगले काम करणाऱ्यांना नेहमीच अडचणी येतात. काहीजण विरोध करतात, पण समाजाच्या भल्यासाठी काम करत राहणे गरजेचे आहे. हे पुरस्कार सोहळे ही चांगुलपणावरचा विश्वास दृढ करण्याची संधी आहेत.”
पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “समाजातील चांगल्या कार्याला नेहमीच पाठिंबा मिळावा. महाश्वेता जीवन गौरव पुरस्कार हा त्यासाठीच दिला जातो.”