पुणे, दि. १ फेब्रुवारी २०२५ : कोंढवा, पिसोळी परिसरातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणच्या दोन नवीन २२ केव्ही वीजवाहिन्या मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते कार्यान्वित करण्यात आल्या. या नवीन वीजवाहिन्यांमुळे ४१ हजार ९०० वीजग्राहकांना दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा मिळणार आहे.
बिबवेवाडी येथील १३२/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून निघणाऱ्या आरती २२ केव्ही औद्योगिक वीजवाहिनीचे तसेच ब्रम्हा २२ केव्ही वीजवाहिनी उभारण्याचे काम पूर्ण झाले. मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते या दोन्ही नवीन वीजवाहिन्या नुकत्याच कार्यान्वित करण्यात आल्या. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, कार्यकारी अभियंता श्री. चंद्रकांत दिघे, श्रीमती वर्षा बोरकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र भुजबळ, सहायक अभियंता श्री. श्रीकांत अवचार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आरती २२ केव्ही औद्योगिक वीजवाहिनीमुळे कुमार पाम २२ केव्ही वीजवाहिनी व शोभा उपकेंद्राचा वीजभार कमी झाला आहे. आरती वीजवाहिनीद्वारे पुण्यधाम आश्रम रोड, टायनी औद्योगिक परिसर, पिसोळी रस्ता परिसरातील १८ हजार ९०० औद्योगिक, व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठ्याचा थेट फायदा होईल.
कोंढवा परिसराला ब्रम्हा स्विचिंग स्टेशनमधून वीजपुरवठा केला जातो. या स्विचिंग स्टेशनला वीजपुरवठा करण्यासाठी ब्रम्हा २२ केव्ही वीजवाहिनीचे काम पूर्ण झाले. त्यामुळे कोंढवा, भाग्योदय नगर, शिवनेरी, कुबा मस्जिद परिसर, वाघजई आदी परिसरातील २३ हजार वीजग्राहकांना दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा होईल. सोबतच ब्रम्हा स्विचिंग स्टेशनला नव्या वीजवाहिनीमुळे पर्यायी वीजपुरवठ्याची सोय देखील उपलब्ध झाली आहे.
– बिबवेवाडी १३२/२२ केव्ही उपकेंद्रातून दोन नवीन २२ केव्ही वीजवाहिन्या मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते कार्य़ान्वित करण्यात आल्या. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले उपस्थित होते.