मुंबई-मला राज्यपाल करणे म्हणजे माझ्या तोंडाला टाळे ठोकणे. मी राज्यपाल होऊन काय करू? त्यापेक्षा मी मोकळाच बरा, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्यापुढे राज्यसभेच्या सदस्यत्वासह राज्यपालपदी संधी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
छगन भुजबळ सध्या राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचेही संकेत दिलेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्यासाठी महायुतीकडून जोरकसपणे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी महायुतीने त्यांच्यापुढे राज्यसभेचे सदस्यत्व किंवा राज्यपालपद स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपरोक्त विधान केले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, मला राज्यपाल करणे म्हणजे माझ्या तोंडाला टाळे ठोकणे. मी राज्यपाल होऊन काय करू? माझे काम गोरगरिबांच्या अडअडचणी सोडवण्याचे आहे. त्यांच्यासाठी भांडण करण्याचे आहे. राज्यपाल होऊन मी त्या समस्या किंवा अडीअडचणी सोडवू शकणार आहे का? माझी राज्यपालपदाचा अपमान करण्याची इच्छा नाही. पण मी असा मोकळाच ठीक आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी पक्षश्रेष्ठींकडून मला नाशिक येथून तयार करण्यास सांगण्यात आले होते. पण महिना लोटला तरी माझ्या नावाची घोषणा झाली नाही. त्यामुळे मी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर राज्यसभा आली. तेव्हा मी राज्यसभेवर जाण्याचा आग्रह धरला. पण पक्षाने सुनेत्रा पवार यांना संधी दिली. त्यानंतर दुसरी राज्यसभा आली. तेव्हा नितीन पाटील यांना करायचे ठरले. खरे सांगायचे तर मी त्या व्यक्तीला ओळखतही नाही.
छगन भुजबळ यांनी यावेळी मनोज जरांगे यांच्या फॅक्टरमुळे आपली लीड कमी झाल्याचेही मान्य केले. विधानसभा निवडणुकीत जरांगे पॅटर्न आला. पण जरांगे कुठेच आले नाहीत. ते येवल्यात आले आणि लीड कमी झाले. मी 60 हजारांनी निवडून आलो. त्यानंतर मला पक्षश्रेष्ठींनी विधानसभेचा राजीनामा देण्याची सूचना केली गेली. पण मी माझ्या लोकांना वाऱ्यावर कसे सोडणार? मला वाटले माझे नाव मंत्रिपदासाठी येईल. कारण, मी पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबत आहे. अजित पवारांना पहिला पाठिंबा देणाराही मीच होतो. अजित पवारांचे नेतृत्व चांगले आहे. पण मानसन्मानाला धक्का लागला तर ते अजिबात योग्य नाही, असे भुजबळ म्हणाले.
दुसरीकडे, एकेठिकाणी बोलताना छगन भुजबळ यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी नव्हे तर हाल – हाल करून मारण्याची मागणी केली. संतोष देशमुख यांना अत्यंत अमानुषपणे मारण्यात आले. राक्षसही अशी कृती करणार नाही. परभणीच्या प्रकरणात पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना ठार मारले. ते मराठा होते की दलित होते हा प्रश्न नाही. ते दोघेही माणसे होती. त्यांना कशा पद्धतीने तुम्ही मारले. सर्वच घटकांनी त्याचा निषेध केला पाहिजे व लढायला पाहिजे. या प्रकणी एखादा या समाजाचा आहे म्हणून हे करा व तो दुसऱ्या समाजाचा आहे म्हणून विरोध करा हे मला काही पटत नाही. दुसऱ्या समाजावर हल्ला करणे हे काही बरोबर नाही. दुसऱ्या समाजावर ठपका ठेवणेही बरोबर नाही. तुमच्या दुःखामध्ये व रागामध्ये मी सुद्धा सहभागी आहे. त्यांना फासावर नाही असे हाल हाल करून मारा, असे ते म्हणालेत.

