पुणे-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. विधानसभा निवडणुकांमधील भाजपच्या विजयासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाष्याचे त्यांनी स्वागत केले आहे.
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना सावंत म्हणाले की, “उशिरा का होईना, राज ठाकरे यांनी भाजपबद्दल सत्य बोलले आहेत. लोकशाही संपवून हुकूमशाहीकडे वाटचाल करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे, त्याला आता विरोध होणे गरजेचे आहे.”
वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ बाबत बोलताना सावंत यांनी स्पष्ट केले की, संयुक्त संसदीय समितीमध्ये ४४ दुरुस्त्यांवर सहा महिने चर्चा झाली. मात्र केंद्र सरकारने कमी वेळ देऊन त्यांच्या पक्षाच्या सूचना स्वीकारल्या नाहीत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका लोकशाहीला मानणारी असताना, भाजपने चुकीचा गैरसमज पसरवल्याचाही आरोप त्यांनी केला.
पक्षांतर बंदी कायद्याबाबत त्यांनी सांगितले की, ठाकरे गटाकडून याचिका दाखल करूनही अद्याप अंतिम निकाल आलेला नाही. विधानसभा निवडणुकांमधील आश्चर्यकारक निकालांनंतर राज ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेतली, ही बाब चांगली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

