आधार सोशल फाउंडेशन आणि उत्कर्ष महिला मंडळातर्फे अटल साधना आणि अटल शक्ती पुरस्कार प्रदान
पुणे: भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या कार्यातून त्याग, निष्ठा समर्पण नेतृत्व आणि कर्तृत्व हे गुण समाजाला दिले. आपण आजच्या तरुणांमध्ये हे विचार रुजवले तर निश्चितच संस्कारक्षम पिढी निर्माण होईल. या संस्कारक्षम पिढीच्या जोरावरच आपण समृद्ध महाराष्ट्र घडवू शकतो, अशी भावना महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
माजी पंतप्रधान स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रत्यर्थ आधार सोशल फाउंडेशन आणि उत्कर्ष महिला मंडळातर्फे सामाजिक कार्यातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी विविध व्यक्तिमत्वांना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते अटल साधना आणि अटल शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे झाला. ह.भ.प. डॉ. चेतनानंदजी उर्फ पंकज महाराज गावडे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, आधार सोशल फाउंडेशनचे प्रमुख दिलीप काळोखे, सविता काळोखे यावेळी उपस्थित होते.
डॉ. राहुल देशमुख यांना अटल शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ज्ञानेश्वर टाकळकर, अरविंद नाथ गोस्वामी, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, आचार्य शाहीर हेमंत राजे मावळे, प्रसाद खंडागळे, स्नेहल शिंदे साखरे, मारुती तुपे, परशुराम जोशी आदी विविध मान्यवरांना अटल साधना पुरस्कार देऊन यावेळी गौरविण्यात आले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, दिलीप काळोखे यांनी आपल्या कार्याच्या झपाट्यातून महत्त्वाचे सामाजिक कार्य निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याची समाजाला निश्चितच गरज आहे अटल साधना आणि अटल शक्ती पुरस्काराच्या माध्यमातून ते केवळ पुरस्कार देत नाहीत तर आजच्या तरुणांमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार रुजवण्याचे महत्त्वाचे काम करत आहेत अशाच तरुणांची आज समाजाला गरज आहे.
पंकज महाराज गावडे म्हणाले, ज्या पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोन्याचा नांगर फिरवला त्या पुण्याचे रूप आज विद्रूप झाले आहे. हे विद्रूप झालेले रूप बदलण्यासाठी आजच्या तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे त्यासाठी तरुणांमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या गुणांची पायाभरणी आपण करणे गरजेचे आहे.
धीरज घाटे म्हणाले, अटल आणि शक्ती या दोन शब्दांच्या माध्यमातून केवळ एक व्यक्तिमत्व उभे राहिले नाही तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने एक राष्ट्रपुरुष निर्माण झाला. अशा राष्ट्रपुरुषांचे विचार समाजामध्ये रुजविण्याचे महत्त्वाचे कार्य दिलीप काळोखे हे करत आहेत. त्यामुळे निश्चितच एक संस्कार क्षम पिढी घडणार आहे.
डॉ. राहुल देशमुख म्हणाले, अंध व्यक्तीचे अंधत्व हे त्याच्यासमोरील अडचण नाही तर डोळस समाजाचे मानसिक अंधत्व हे मुख्य अडथळा आहे. हा अडथळा दूर करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे, तरच अशा व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळू शकते.
दिलीप काळोखे म्हणाले, अटल साधना आणि अटल शक्ती या पुरस्काराच्या माध्यमातून श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचावेत हा आमचा उद्देश आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार तरुणांमध्ये रुजवले गेले, तर निश्चितच एक संस्कारक्षम समाज निर्माण होऊ शकतो.

