पुणे : महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे शनिवार, दि. 1 फेब्रुवारी ते शुक्रवार, दि. 7 फेब्रुवारी 2025 या कालावधीत महामाता रमाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महोत्सवाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या स्मृतींना व विचारांना उजाळा देण्यासाठी महोत्सवाचे आयोजन केले जाते. लोकसहभागातून होणारा महामाता रमाई महोत्सव एकमेव आहे. महोत्सव दररोज सायंकाळी 6 ते 8 या वेळात रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वाडिया कॉलेज समोर येथे होणार आहे. लता राजगुरू महोत्सवाच्या स्वागताध्यक्ष आहेत.
महोत्सवाचे उद्घाटन दि. 1 रोजी रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय संविधनाच्या प्रियांबलचे सामूहिक वाचन करून होणार आहे. रामजीबाबा आंबेडकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा दि. 2 रोजी आयोजित करण्यात आला असून महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचा पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे.
दि. 3 रोजी बाबासाहेबांच्या जीवनात रमाईंचे योगदान या विषयावर प्रबोधनकार ताहेर शेख यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी समाजसेवक अंजुम इनामदार असणार आहेत. दि. 4 रोजी आडकर फौंडेशनच्या सहकार्याने विनोदी कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात भालचंद्र कोळपकर, अनिल दीक्षित यांचा सहभाग असून अध्यक्षस्थानी प्रभा सोनवणे असणार आहेत.
दि. 5 रोजी रमाईंच्या लेकरांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून महाराष्ट्रातील कवी यात सहभागी होणार आहेत. अध्यक्षस्थानी विनोद अष्ठुळ असतील. दि. 6 रोजी सरदार भोलासिंग आरोरा, फिरोज मुल्ला, विल्सन चंदवेळ, डॉ. वैष्णवी किराड, बौधाचार्य आर. के. लोंढे या धर्म प्रमुखांच्या उपस्थितीत महामाता रमाई यांना वंदन केले जाणार आहे.
रमाईरत्न पुरस्कार वितरण सोहळा दि. 7 रोजी आयोजित करण्यात आला असून खासदार सुनेत्रा पवार, एम. आय. टी. शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांचा पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.