हरियाणवी, भोजपुरीत समालोचन; पण मराठीत नाही,आता चॅम्पियन ट्रॉफीपासून मराठीत होणार समालोचन
मुंबई–मनसेचे चित्रपट विभागाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आज मराठीच्या मुद्द्यावरून हॉटस्टार कार्यालयात धडक दिली होती. क्रिकेट सामन्यांच्या समालोचनासाठी मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती. ही मागणी मान्य करण्यासाठी अमेय खोपकर सुमारे 3 तास हॉटस्टारच्या कार्यालयात ठिय्या मांडून बसले होते. लेखी आश्वासनानंतर अमेय खोपकर यांनी आपला ठिय्या मागे घेतला. तसेच या आश्वासनाची पूर्तता लवकरात लवकर न केल्यास कार्यालयाच्या काचा फुटतील, असा इशाराही यावेळी कंपनीला देण्यात आला.
या आंदोलनानंतर अमेय खोपकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आम्ही भेटायला नाही, तर धमकी द्यायला आलो होतो. महाराष्ट्रात मराठी भाषा लागावी यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागत असले, तर यापेक्षा दुसरी काही शोकांतिका नाही. महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी भांडावे लागते. इथे आल्यानंतर यांचे वरचे अधिकारी मराठी माणसाला पुढे करतात, असे ते म्हणाले.
हॉटस्टारवर प्रक्षेपित होणाऱ्या क्रिकेट सामन्यांचे मराठीमध्ये समालोचन करू, असे लेखी आश्वासन जोपर्यंत आम्हाला कंपनीकडून मिळत नाही, तोपर्यंत जाणार नव्हतो. आता हॉटस्टारकडून आम्हाला राज ठाकरेंच्या नावाने पत्र दिले आहे. इतर आवश्यक गोष्टींसाठी आम्ही त्यांना वेळ देत आहोत. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीपासून हॉटस्टारवर क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेत समालोचन होणार असल्याची ग्वाही कंपनीने दिलेली आहे.
महाराष्ट्रामध्ये माज हा फक्त मराठी माणसानेच करायचा, इतर लोकांनी आमच्यावर दादागिरी करायची नाही, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे. आपण देखील क्रिकेट सामना पाहताना मराठी भाषेचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी मराठी प्रेक्षकांना केले आहे.दरम्यान, 25 जानेवारी रोजी भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा टी-ट्वेंटी सामना झाला. या सामन्यात भारताने इंग्लंडला दोन गडी राखून पराभवाची धूळ चारली. या सामन्याचे प्रक्षेपण हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म करण्यात आले होते. यावेळी हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलगूसह बंगाली, हरियाणी, कन्नड आणि भोजपुरी भाषेतून सामन्याचे समालोचन करण्यात आले. मात्र मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध नव्हता.‘हॉटस्टार’वर प्रसारित होणाऱ्या भारत-इंग्लंड टी-20 सामन्याचे समालोचन हरियाणी आणि भोजपुरी भाषेतूनही केले जात आहे, पण यात मराठी भाषा नाही. अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही मराठीला ही अशी वागणूक देण्याची हिंमतच कशी होते? असा सवाल करत स्टार नेटवर्क यांना अभिजात म्हणजे काय त्याचा मनसे स्टाईल धडा द्यावाच लागेल, असा इशारा अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावरून दिला होता. त्यानंतर ते आज हॉटस्टारच्या कार्यालयात दाखल झाले.