पुणे:माजी आमदार अनिल भोसले यांना जामीन मंजूर झाला आहे. पुण्यातील शिवाजी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल भोसले यांच्या जामीन याचिकेला मंजूरी दिली आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून भोसले कारागृहात होते .
अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. ते महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले होते. २०१० ते २०१६ या काळात ते राज्याच्या राजकारणात सक्रीय होते. ते शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि संचालक होते.
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेमध्ये तब्बल ७२ कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडी या दोन्ही विभागांनी भोसले यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले होते. या दोन्ही गुन्ह्यांत त्यांना जामीन मिळाला आहे.
२०१७ मध्ये महानगरपालिका निवडणुकांच्या वेळी अनिल भोसले यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेविका बनू इच्छित होत्या. पण उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपचा पाठिंबा घेत त्या नगरसेविका बनल्या. यानंतर भोसले कुटुंब आणि पवार यांच्यात वितुष्ट आले होते. पुढे २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अनिल भोसले यांना घोटाळ्याच्या अंतर्गत अटक झाली होती.