शास्त्रज्ञ डॉ. टोनी नेडर, आयपीएस महेश भागवत व आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सदानंद सरदेशमुख यांना ‘मानद डॉक्टर ऑफ सायन्स’
पुणे: डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठ संचालित डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पुणे, यांच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथील ऑल इंडिया आयुर्वेद काँग्रेस, नेदरलँड येथील इंटरनॅशनल महर्षी आयुर्वेद फाउंडेशन व इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद यांच्या सहकार्याने आयोजित आठव्या इंटरनॅशनल आयुर्वेद काँग्रेसचे (आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन) आयोजन करण्यात आले आहे. हे दोन दिवसीय आयुर्वेद संमेलन पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात दि. १ व २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. जगभरातून आयुर्वेदातील तज्ज्ञ, संशोधक, अध्यापक आणि विद्यार्थी सहभागी होतील. आयुर्वेदातील विविध विषयावर व्याख्याने, शोधनिबंध सादरीकरण व विचार मंथन होणार आहे, अशी माहिती डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव यांनी दिली.
प्रसंगी ब्राझील येथील आयुर्वेदाचार्य डॉ. जोस रोगे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. गुणवंत येवला, संशोधन संचालक प्रा. डॉ. अस्मिता वेले, कायाचिकित्सा विभागप्रमुख प्रा. डॉ. डी. जी. दीपांकर, रचना विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. योगेश कुट्टे आदी उपस्थित होते. ब्राझिलमधील आयुर्वेदाचे १६ विद्यार्थी या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलनासाठी दाखल झाले आहेत.
डॉ. स्मिता जाधव म्हणाल्या, “या दोन दिवसीय आयुर्वेद संमेलनास भारत सरकारच्या आयुष मंत्रालय, तसेच नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनची मान्यता प्राप्त झाली आहे. या संमेलनाच्या माध्यमातून आयुर्वेदातील संशोधन, नाविन्यपूर्ण संशोधन, भविष्यकाळात आयुर्वेदाची व्याप्ती, गरजा, उपाय योजना आणि अनेक विकार आणि चिकित्सा या विषयावर विचारमंथन होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांशी संलग्नता व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन आणलेली ‘एकात्मिक आरोग्य योजना’, ‘हील इन इंडिया’ या योजनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन महत्वपूर्ण ठरेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर आयुर्वेद, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण प्रयोग याविषयी जाणून घेण्याची संधी अशा संमेलनातून विद्यार्थ्यांना मिळते. संशोधन वृत्ती वाढून इनोव्हेशन, स्टार्टअप्स संस्कृतीला चालना मिळते.”
प्राचार्य डॉ. गुणवंत येवला म्हणाले, “संमेलनात पहिल्या दिवशी विशेष पदवीप्रदान सोहळा होणार असून, या कार्यक्रमात अमेरिकेतील ग्लोबल ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. टोनी नेडर, तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत आणि वाघोली येथील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे अध्यक्ष, आयुर्वेदतज्ज्ञ प्रा. डॉ. सदानंद सरदेशमुख यांना उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘मानद डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सचिव व प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव, खजिनदार डॉ. यशराज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील उपस्थित राहणार आहेत.”
संमेलनात दुसऱ्या दिवशी केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रतापराव जाधव यांचे विशेष संबोधन असणार आहे. यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. टोनी नाडर, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनचे चेअरमन वैद्य जयंत देवपुजारी, ‘आयुष’चे नॅशनल रिसर्च प्रोफेसर डॉ. भूषण पटवर्धन, ऑल इंडिया आयुर्वेद काँग्रेसचे चेअरमन वैद्य देवेंद्र त्रिगुणा, इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेदाचे प्रा. डॉ. सुभाष रानडे, नेदरलँड येथील इंटरनॅशनल महर्षी आयुर्वेद फाउंडेशनचे चेअरमन डॉ. रेनर पिचा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात दहा देशातील १०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि १२०० हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील संशोधक, वैद्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी होत आहेत. देश-परदेशातील आयुर्वेदाशी निगडित ५०० हुन अधिक विद्यार्थी, डॉक्टर व संशोधक आपले शोधनिबंध सादर करणार आहेत.