अहिल्यानगर : लोकशाही प्रक्रियेत मतदार हा राजा मानला जातो. पण, सध्या निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणामुळे मतदारांवर अन्याय होत आहे, त्यांचा कौल डावलला जात आहे, अशी टीका माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगर शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना आज (शनिवारी) निवेदन देण्यात आले, त्यात निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. निवेदन दिल्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे मोहन जोशींची पत्रकार परिषद झाली. यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष अनिस चुडीवाला, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
देशातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी आयोगाची आहे. परंतु मागील काही वर्षातील आयोगाची भूमिका पक्षपाती दिसत आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत केला.
लोकसभा निवडणुकीनंतर सहाच महिन्यात काही लाख मतदार कसे वाढले? यातील सत्य जनतेसमोर आले पाहिजे, असे मोहन जोशी यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता जाहीर केलेली व आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी यामध्ये मोठी तफावत आहे. यातही ७६ लाख मतदान वाढलेले दाखवले आहे. मतदार यादीतील घोळ, रात्रीच्या अंधारात वाढलेले ७६ लाख मतदान याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली असता आजपर्यंत ही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अचानक एवढ्या मोठ्या संख्येने मते वाढली कशी, याचे उत्तर निवडणूक आयोग का देत नाही?असा सवाल यावेळी मोहन जोशी यांनी केला.
लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हता अबाधित राहील याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे काँग्रेसने केली असल्याचे जोशी यांनी यावेळी सांगितले.

