पुणे- लोहगाव परिसरात राहणार्या एक ३२ वर्षीय महिलेवर बंदुकीचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करून तिला जबरदस्तीने धर्मांतर करण्यास प्रवृत्त करण्याच्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा महिला मोर्चा पुणे शहरातर्फे परीमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांना संबंधित आरोपींवर लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करुन त्यांना कठोर शिक्षा व्हावी तसेच भविष्यात पुणे शहरामध्ये याप्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना करण्याबाबत निवेदन देण्यात आले.भाजपा महिला मोर्चा च्या शहर अध्यक्ष हर्षदा अभिजीत फरांदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन दिले .
पोलीस उपायुक्तांनी देखील याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस प्रशासनाकडून याप्रकरणी योग्य दिशेने कारवाई चालू असून लवकरात याप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाईल व दोषींना कठोर शिक्षेची मागणी करण्यात येईल तसेच पोलीस प्रशासन याप्रकारच्या घटनांबाबत दक्ष असून असे प्रकार घडू नयेत यासाठी तात्काळ उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन यावेळी दिले.
याप्रसंगी भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष संतोष खांदवे, महिला मोर्चा पुणे शहर सरचिटणीस भावना शेळके, उज्वला गौड, शामा जाधव, उपाध्यक्ष प्रिती भट्टी-पाटील, चिटणीस सुवर्णा काकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

