पुणे- हिंजवडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी एक भीषण अपघात झाला होता. त्यात भरधाव वेगातील एका डंपरने स्कुटरवरून जाणाऱ्या 2 इंजिनिअर तरुणींना चिरडले होते. हा डंपर अक्षरशः या तरुणींच्या अंगावर पडला होता. त्यामुळे त्यांच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघाताच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यात या अपघाताची भीषणता स्पष्टपणे दिसून येते. अंगावर काटा आणणाऱ्या या व्हिडिओत चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर हा भरधाव महाकाय डंपर तरुणींच्या अंगावर पडताना दिसून येत आहे.पुण्यातील हिंजवडी भागात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका अपघातात डंपरखाली 2 इंजिनिअर तरुणी ठार झाल्या होत्या. या अपघाताचा अंगावर काटे आणणारा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यात भरधाव वेगातील डंपरखाली दोन्ही इंजिनिअर तरुणी चिरडताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रेडिमिक्सने भरलेला डंपर हिंजवडीहून महाळुंगेच्या दिशेने जात होता. तो वडजाईनगर येथील चौकातून वळण घेत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे तो उलटला. गंभीर बाब म्हणजे त्याचवेळी तेथून 2 तरुणी स्कुटरवरून जात होत्या. हा डंपर त्यांच्या अंगावर पडल्यामुळे त्यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. मृत तरुणींचे वय अंदाजे 20 ते 25 वर्षे असून, त्या आयटी क्षेत्रात अभियंता म्हणून कार्यरत होत्या.
यावेळी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ अपघाताच्या दिशेने धाव घेतली. त्यापैकी काहींनी त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसही लवकरच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी क्रेनच्या मदतीने रेडिमिक्स डंपर बाजूला करून दोन्ही तरुणींना बाहेर काढण्याचे काम केले. सध्या मृत तरुणींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. सध्या हिंजवडी पोलिसांनी डंपरच्या चालकाला ताब्यात घेतले आहे.

