पुणे– महापालिकेत गेल्या काही दिवसापासून रितसर सेवा प्रवेश नियम डावलले जात असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी देखील याला कुठलाही विरोध करत नाहीत. यामुळे मात्र महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे चित्र आहे. अशा गोष्टीवर वेळीच तोडगा नाही काढला तर कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत राहील, अशी चर्चा आता महापालिका वर्तुळात सुरू आहे.
असाच प्रकार क्रीडा अधिकारी (वर्ग २) या पदावरून सुरू आहे. महापालिकेत याची दोन पदे रिक्त आहेत. या पदाच्या आकृतीबंध नुसार यातील एक जागा ही सरळसेवा किंवा नामनिर्देशन ने भरणे बंधनकारक आहे. तर एक जागा ही पदोन्नती ने भरणे बंधनकारक आहे. असे असताना देखील या दोन्ही जागा नामनिर्देशन अनुसार भरण्याचा घाट घातला गेला आहे.
राज्य सरकारने महापालिकेला आदेशित केले आहे की, शिवराज राक्षे आणि रेश्मा पुणेकर या दोघांना क्रीडा अधिकारी या पदावर नियुक्ती द्यावी. मात्र याला कर्मचारी निवड समितीने हरकत घेतली होती. नियमानुसार असे करता येणार नाही, त्यामुळे याबाबत राज्य सरकारनचे मार्गदर्शन घ्यावे, अशी शिफारस समितीने केली होती. मात्र प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही शिफारस लक्षात न घेता क्रीडा समिती आणि मुख्य सभेत या बाबतचा प्रस्ताव मान्य करून घेतला आहे.
यामुळे महापालिका कर्मचारी जे पदोन्नती मिळण्याची वाट पाहून आहेत, त्यांच्यावर होणार आहे. त्यांना आता आहे त्याच पदावर काम करावे लागणार आहे. पदोन्नती ची संधी त्यांच्या हातून निसटणार आहे. दरम्यान याबाबत कर्मचारी संघटनेने देखील विरोध केला होता, असे असताना देखील या नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयावर कर्मचारी नाराज आहेत. कर्मचाऱ्यांनी कोर्टाची पायरी चढण्याची देखील तयारी केली आहे.