मुंबई :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने कालबाह्य योजनांचा अभ्यास करून त्या नव्याने तयार करून या योजनांची सांगड शासनाच्या विविध विभागाच्या योजनेशी घालावी. तसेच नवीन उद्योजक तयार करण्यासाठी लोकाभिमुख योजना तयार कराव्यात, असे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची आढावा बैठक झाली. या बैठकीस महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लहूराज माळी, महाव्यवस्थापक राकेश बेत, उप महाव्यवस्थापक शरद लोंढे, उप महाव्यवस्थापक वैशाली जाधव, प्रादेशिक व्यवस्थापक शिंदे उपस्थित होते.सामाजिक न्याय राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, प्रशिक्षणासाठी चांगल्या संस्थेची निवड करावी व प्रशिक्षण संस्था दर्जेदार प्रशिक्षण देत असल्याची खात्री करावी. सफाई कामगार यांच्यासाठीच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. महामंडळाच्या लाभार्थी योजनांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यासंदर्भात धोरण ठरविण्यात येत असून लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या महामंडळचा उत्पन्न वाढीसाठीचा प्रस्ताव तयार करावा ज्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देता येईल. मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळाने प्रयत्न करावेत , अशा सूचना सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी दिल्या.यावेळी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातील विविध योजनांचा तसेच लाभार्थ्यांना महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाबाबत आढावा घेण्यात आला.