संबंधितांवर कठोर कारवाईच्या दिल्या सूचना
पुणे, : पुणे जिल्ह्यामधील मावळ तालुक्यातील एका निवासी आश्रम शाळेत दोन अल्पवयीन मुलांवर अत्याचार झाल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत, अत्याचाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय सचिव, आदिवासी विकास विभाग सचिव, महिला व बालविकास विभाग सचिव, जिल्हाधिकारी पुणे आणि पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना दिले आहेत.
कंत्राटी आरोपी शिक्षक जगदीश गोपाळ घोलप याने दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २१ जानेवारी २०२५ रोजी वडगाव, मावळ पोलीस स्टेशन येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
‘ही बाब अतिशय निंदनीय आहे. हलाखीची परिस्थिती असल्यामुळे शैक्षणिक कारणास्तव निवासी शाळांमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलांची सुरक्षा धोक्यात असल्याचे यातून निष्पन्न होते. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षे संदर्भात कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन अंमलबजावणी यंत्रणांमार्फत अत्यंत आवश्यक असल्याचे यातून अधोरेखित होते’, असे म्हणत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत.
सदर बाल लैंगिक अत्याचाराबाबत सखोल चौकशी करण्यात यावी व यातील दोषींवर पॉक्सो इत्यादी प्रचलित तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर, या प्रकरणातील अल्पवयीन मुलांचे संरक्षण व समुपदेशन योग्य पद्धतीने करण्यात यावे. पुणे जिल्ह्यातील बालकल्याण समितीमार्फत सदर घटनेची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.
या प्रकरणी चार्जशीट मुदतीत दाखल करून अनुभवी व निष्णात सरकारी अभियोक्ता नियुक्त करून आरोपीस कठोर शिक्षा करण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच, राज्यातील निवासी आश्रम शाळांमध्ये गुड टच बॅड टच बाबत मुलांना माहिती दिली जात असल्याची खातरजमा करावी. राज्यातील निवासी आश्रम शाळांमधील बाल लैंगिक अत्याचार विषयक घटना टाळण्यासाठी जिल्हा निहाय बाल कल्याण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत याबाबत खातरजमा करण्यात यावी व त्यांचे योग्य संनियंत्रण करण्यात यावे याबाबत संबंधित विभागांना त्यांनी निर्देश दिले आहेत